मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे ५ आणि महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. भाजपाकडे ४ जागा निवडून येतील इतके संख्याबळ आहे तर पाचव्या जागाही निवडून येईल असा विश्वास भाजपा नेते व्यक्त करत आहेत.
भाजपानं या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्यांवर विभागावार जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडणुकीबाबत माजी मंत्री आणि भाजपा नेते परिणय फुके म्हणाले की, राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत तसाच चमत्कार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात दाखवणार आहे. विधान परिषदेत गुप्त मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये आमदारांची नाराजी आहे. ही नाराजी विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मत दाखवून मतदान करायचं होतं परंतु विधान परिषदेत तसे नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत १०० टक्के भाजपा या निवडणुकीत यश मिळवणार आहे. २० जूनला भाजपाचा विजय झालेला दिसून येईल. १० तारखेचा चमत्कार २० तारखेलाही होईल. भाजपाच्या आमदारांशी समन्वय साधण्याची गरज नाही. पक्षाचा आदेश आल्यानंतर ते मुंबईला मतदानाला येतील. त्याचसोबत इतर आमदारांशी संपर्क साधणं सुरू झालं आहे. प्रत्येकाशी बोलणं होत आहे. बहुतांश आमदारांची बोलणं झालं आहे. भाजपा नेत्यांवर विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे अशी माहिती परिणय फुके यांनी दिली.
विधान परिषदेत विजयाचा गुलाल उधळणार
राज्यसभेच्या निकालानंतर विधान परिषदेसाठी गुलाल शिल्लक ठेवला आहे. आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा चांगल्या मतांनी जिंकणार आहोत. जो भूकंप राज्यसभा निकालात झाला तोच विधान परिषदेच्या निकालात होईल. विधान परिषदेत भाजपाला यश मिळेल. निवडणुकीच्या पूर्वयोजनेसाठी बैठक झाली. आगामी काळात महापालिका, नगरपालिका, जि. प. निवडणुका होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.