"आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजपाचा डाव, गरिबीला जात म्हणून...", काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:02 PM2023-11-07T18:02:36+5:302023-11-07T18:03:16+5:30

Nana Patole Criticize BJP: भारतीय जनता पक्ष हा आरक्षणविरोधी आहे, त्यांना आरक्षण संपवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच गरिब ही जात आहे असे सांगत आहेत, गरिब व श्रीमंत या दोन जाती ठरवून गरिब जनतेला शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या कमजोर करुन गुलाम बनवण्याचा मनुसुबा आहे.

"BJP's plan to make India reservation-free, as a caste to poverty...", a serious allegation of Congress | "आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजपाचा डाव, गरिबीला जात म्हणून...", काँग्रेसचा गंभीर आरोप

"आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजपाचा डाव, गरिबीला जात म्हणून...", काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबई - मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने जाहीरपणे करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही त्यामुळे आरक्षणाप्रश्नावरभाजपा व शिंदे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष हा आरक्षणविरोधी आहे, त्यांना आरक्षण संपवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच गरिब ही जात आहे असे सांगत आहेत, गरिब व श्रीमंत या दोन जाती ठरवून गरिब जनतेला शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या कमजोर करुन गुलाम बनवण्याचा मनुसुबा आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका सर्व पक्षिय बैठकीत मांडण्यात आली होती पण तसे होताना दिसत नाही. दोन जातींमध्ये तणाव निर्माण करून राज्याला भेडसावत असलेले महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, ड्रग्जची तस्करी या मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वातावरण बिघडवले जात आहे. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या मतांवर भाजपा सत्तेत आला पण त्यांना आरक्षण दिलेच नाही. मराठा आरक्षणाविरोधात बाजू मांडू नका असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते असे त्यावेळी सरकारची बाजू न्यायालयात मांडणारे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनीच सांगितले आहे.

आरक्षणाविरोधात ज्या लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या, त्यांच्यामागे कोण आहेत हे राज्यातील जनतेला माहित आहे. भारतीय जनता पक्ष हा आरक्षणविरोधी आहे, त्यांना आरक्षण संपवायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच गरिब ही जात आहे असे सांगत आहेत, गरिब व श्रीमंत या दोन जाती ठरवून गरिब जनतेला शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या कमजोर करुन गुलाम बनवण्याचा मनुसुबा आहे. भाजपाचा हा मनसुबा मात्र कधीच यशस्वी होणार नाही. 

मागास जातींना आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आरक्षण प्रश्नी आज तो वाद सुरु आहे त्यातून मार्ग काढायचा असेल तर, जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांनी ही भूमिका देशभर मांडली आहे पण केंद्रातील भाजपा सरकार मत्र यावर निर्णय घेत नाही कारण भाजपा हा आरक्षण विरोधी पक्ष आहे. 

बीडमधील जाळपोळीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. गृहखाते कमी पडत आहे हे स्पष्ट दिसत आहे. बीडमध्ये जी जाळपोळ करण्यात आली त्यामागे कोणतीतरी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही. कोणतरी राजकीय फूस लावल्याशिवाय अशी जाळपोळ होत नाही. या सर्व प्रकारामागे सरकारचा हात असू शकतो असे पटोले म्हणाले.

कुणबी प्रमाणपत्राबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. जात प्रमाणपत्र देताना फॅमिली ट्री लागतो तरच असे प्रमाणपत्र देता येते, सरकार आज जे करत आहे ती तात्पुरता व्यवस्था आहे कायमस्वरूपी नाही.
 

Web Title: "BJP's plan to make India reservation-free, as a caste to poverty...", a serious allegation of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.