निवडणुकीपूर्वीच काँग्रेस खिळखिळी करण्यावर भाजपचा भर !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 05:56 PM2019-07-12T17:56:56+5:302019-07-12T18:01:12+5:30
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. परंतु, त्यांच्याविषयी पक्षच अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नाही, तर मेळ घालावा लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.
मुंबई - भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार भाजपमध्ये आणून स्पर्धा संपविण्याची मोहिमच जणू भाजपने आखली आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारही संभाव्य समिकरणे डोळ्यांसमोर ठेवून पक्षांतराची भूमिका घेण्याची शक्यता असून या मोहिमेला नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील मदत करत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच विरोधकांना कमजोर करून युद्धाला सामोरे जायचं, अशीच काहीशी योजना भाजपची दिसत आहे.
शिवसेनेतून काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा प्रवास करणारे विखे पाटील यांनी भाजपात दाखल होताच, मंत्रीपद पदरात पाडून घेतले. तर भाजपने देखील विखेंसाठी पायघड्याच घातल्याचे चित्र आहे. विखे यांच्या प्रवेशापूर्वीच विद्यमान खासदार दिलीप गांधींना डावलून भाजपने सुजय विखे यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. सुजय विखे खासदार होताच, राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देऊन भाजपने विधानसभेची तयारी सुरू केली.
आता विखे पाटील देखील भाजपकडून मिळालेल्या खासदारकी आणि मंत्रीपदाची परतफेड करण्यास जीवाच रान करताना दिसत आहेत. विखेंकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी असली तरी काँग्रेसच्या अनेक आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी विखे प्रयत्नशील आहेत. किंबहुना भाजपमध्ये येण्यास इच्छूक असलेल्यांसाठी विखे पाटील दुवा म्हणून तर काम करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या घरी फराळ केल्याने चर्चांना उधाण आले आहे. भालके देखील लवकरच भाजपवासी होणार अशी चर्चा सोलापुरात आहे. या व्यतिरिक्त सोलापूरमधील काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचा चर्चा आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. परंतु, त्यांच्याविषयी पक्षच अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नाही, तर मेळ घालावा लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.