नाशिक : काही महिन्यांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये केलेल्या विकासाची ब्ल्यू प्रिंट दाखविली. नाशिकची सून या नात्याने मला या गोष्टीचा फार अभिमान वाटत होता, परंतु प्रत्यक्ष असा कोणताही विकास झालेला नसून, ‘ब्ल्यू प्रिंट’ ही कागदावरच असल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला.भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने सिडकोतील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयात आयोजित महिला मेळाव्यात खा. मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ‘आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्या, तरी राजकारणात महिलांना निवडणुकीत महिला आरक्षण असल्याने नाइलाजास्तव तिकीट दिले जाते, परंतु आता मागे न राहता, महिलांनी राजकारणात आपल्याशिवाय पर्यायच नाही, अशी परिस्थिती तयार करण्याची वेळ आली आहे.’‘घरातील महिला सक्षमीकरण होण्यास संपूर्ण कुटुंबाचे योगदान गरजेचे असून, आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने राजकारणात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही या वेळी त्यांनी केले. भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
भाजपाच्या प्रीतम मुंडेंची राज ठाकरेंवर टीका
By admin | Published: February 08, 2016 4:24 AM