मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता अवघे काही दिवसाच बाकी आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून सध्या आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येत आहे. आघाडीकडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन मिळाले. त्यानंतर आता शिवसेना आणि भाजप देखील आश्वासनांसाठी मैदानात उतरली आहे.
विरोधकांनी आश्वासने दिल्यानंतर शिवसेनेने आपला स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. त्यापाठोपाठ आता भाजपची शिवसेनेच्या वचनांना शह देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र लढत असले तरी उभय पक्षांमधील जुगलबंदी मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाप्रमाणेच सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झाले. त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांना वर्षाला 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. शेतकरी मदतीच्या बाबती सेनेने भाजपला शह दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीव्यतिरिक्त सेनेने सर्वसामान्यांना केवळ 10 रुपयांत सकस आणि पोटभर जेवण देण्याची घोषणा केली. त्यासाठी प्रत्येक शहरात मध्यवर्थी स्वयंपाकगृहाची स्थापना करण्याचं वचनही सेनेच्या वतीने देण्यात आले. याला शह देण्यासाठी भाजपने मागील पाच महिन्यापासून सुरू असलेली महाराष्ट्र अटल आहार योजनेच्या 5 रुपयांत पोटभर जेवण योजनेची व्याप्ती वाढविण्याचं ठरवलं आहे. एकूणच भाजपच्या सहा हजारांच्या मदतीवर सेनेचे 10 हजार रुपयांचा बाण मारला. तर सेनेच्या 10 रुपयांत पोटभर जेवणाच्या योजनेवर भाजपने अटल आहार योजनेतून 'पंच' लगावला आहे.