भाजपाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार; फलटणचे जावई...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:17 PM2022-07-01T16:17:29+5:302022-07-01T16:19:52+5:30
भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे.
भाजपाने गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्याचे धक्के देण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा सर्वांचाच कयास असताना एकनाथ शिंदेंच्या गळ्यात ती माळ घालून फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास भाग पाडले आहे. यातच आज शिवसेनेचेच एकेकाळचे खंदे नेते राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार केले आहे.
राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत.
भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.