ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 6 - अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांना ७८ हजार ५१ मते मिळालीत. विजयासाठी ६१ हजार ९९२ मते आवश्यक असताना पाटलांना पहिल्याच फेरीत १६ हजार ६० मते अधिक मिळवीत एकतर्फी विजय प्राप्त केला.येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजतापासून ३० टेबल्सवर मतमोजणीला सुरुवात झाली. यापूर्वी ३ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ३३ हजार ९८२ मतदान झाले होते. यापैकी अवैध मते व नोटा वगळता उर्वरित मतांच्या निम्मे अधिक एक असा विजयी उमेदवाराचा कोटा असतो. एकूण मतदानाची प्रत्येक टेबलवर हजार अशी ३० टेबलवर ३० हजार अशी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण मतदान मोजणीच्या अखेरच्या पाचव्या फेरीत पाटलांना ७८ हजार ५१ मते मिळालीत.रणजित पाटील यांना पहिल्या फेरीत १८ हजार ५०८, दुसऱ्या फेरीत १८ हजार २९५, तिसऱ्या फेरीत १८ हजार १२२, चौथ्या फेरीत १६ हजार ८१ व पाचव्या फेरीत ६ हजार ८४८ अशी एकूण ७८ हजार ५१ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांना पहिल्या फेरीत ६ हजार ११९, दुसऱ्या फेरीत ६ हजार ७५२, तिसऱ्या फेरीत ७ हजार २२५, चौथ्या फेरीत ९ हजार १५२ व पाचव्या फेरीत ४ हजार ७३० असे एकूण ३४ हजार १५४ मते प्राप्त झालीत. या निवडणुकीत पदवीधरांचे मोठ्या प्रमाणावर अवैध मतदान झाले. अखेरच्या फेरीअखेर १० हजार १५४ असे अवैध मतदान होते. रिंगणातील १३ उमेदवारांंपैकी तिसऱ्या क्रमांकाची मते अवैध ठरलीत, हे येथे उल्लेखनीय.पक्ष संघटना व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच हा विजय संपादन करता आला. कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेऊन मतदार नोंदणी केली. पाच जिल्ह्यात मंथन झाले त्यातून यशाचा हा अमृतकलश प्राप्त झाला आहे.- रणजित पाटील,विजयी उमेदवार
अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे रणजित पाटील विजयी
By admin | Published: February 06, 2017 7:49 PM