ठाण्यात अजित पवारांच्या मदतीने भाजपची शिवसेनेला रोखण्याची ‘क्रांती’?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:01 AM2023-08-11T09:01:04+5:302023-08-11T09:01:31+5:30
अजित पवार यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली नाही. लागलीच ‘आभार दादा’ असे ट्वीट आव्हाड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात क्रांती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे महापालिकेतील ३६ जागांवर पवार हे दावा करतील. यातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात जर पवार यांना यश आले तर ठाण्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला पवारांच्या मदतीने ठाण्यातील सत्तेचे दार उघडू शकते. ठाण्यात एकनाथ शिंदे यांना रोखण्याकरिता पवार हा भाजपच्या हातामधील हुकमी एक्का ठरणार आहे.
अजित पवार यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली नाही. लागलीच ‘आभार दादा’ असे ट्वीट आव्हाड यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील बंड ही शरद व अजित पवार यांची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या टीकेचा इन्कार करतात. आव्हाड यांचे ठाण्यातील महत्त्व कमी करण्याकरिता पवार यांनी त्यांना अनुल्लेखाने मारले, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ठाणे म्हणजे आव्हाड हे समीकरण पुसून टाकण्याच्या हेतूने पवार यांनी आव्हाडांवर टीका केली नाही. नजीब मुल्ला व आनंद परांजपे हे आव्हाडांचे पर्याय ठाण्यात उभे करण्याचा त्यांचा इरादा आहे.
मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार
राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार यांना मिळाले तर राष्ट्रवादीच्या ३६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस या नात्याने अजित पवार हे दावा करणार आहेत. भाजपचे बहुतांश नगरसेवक हे आमदार संजय केळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादीची कळव्यात लढत ही शिवसेनेसोबत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतरही महायुती म्हणूनच महापालिका निवडणुका लढविल्या गेल्या तर शिवसेनेला राष्ट्रवादीच्या जागांवर दावा करता येणार नाही. त्यामुळे पवार यांना हाताशी धरून ठाण्यात सत्तेचा सोपान चढण्याची क्रांती करण्याचा हा भाजपचा डाव असून, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.