ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - महापालिका निवडणूकींचे बिगुल वाजले असले तरीही भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षात युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही पक्षातील युतीची बोलणी थांबली असून आता एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. युतीच्या निर्णयासाठी आजचा शेटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.
निवडणूक समितीची तीन दिवस 20 तास बैठक घेऊन भाजपाने ५१२ नावांची वॉर्ड निहाय चर्चा करुन यादी तयार केली आहे. मात्र अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांना देण्यात आले आहेत.
आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखालीगठीत झालेल्या या निवडणूक समितीत 29 सदस्यांचा समावेश होता. या समितीने सलग तीन दिवस 20 तास मॅरेथॉन व सखोल चर्चा केली. काल रात्री 3 वाजता समितीची बैठक संपली. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्यामध्ये पहिली चाळण लावून 1769 नावांची यादी तयार करण्यात आली. मात्र त्यानंतरही ब-याच नावांचा विचार करून समितीने अखेर 513 नावांची यादी तयार केली.
प्रत्येक वॉर्डासाठी 2 ते 3 नावे या प्रमाणे ही यादी तयार असून, युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवण्यात येईल.