विधान सभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:19 AM2019-07-23T11:19:28+5:302019-07-23T11:20:33+5:30
अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरात शानदार विजय मिळवला. त्यासाठी खास रणनिती भाजपकडून करण्यात आली होती. प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक विभागात भाजपकडून विशिष्ट व्यक्तींवर हल्लाबोल करण्यात आला होता. महाराष्ट्रात काँग्रेसला वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रडारवर शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय होते. भाजपला ही रणनिती फायदेशीरच ठरली. आता भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन रणनिती आखल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपुरात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांनी पवार कुटुंबियांवर हल्लाबोल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. परंतु, ही भाजपची निवडणुकीची रणनिती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. त्याच पद्धतीची रणनिती आता पुन्हा आखण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, यावेळी शरद पवार नव्हे तर अजित पवार भाजपच्या रणनितीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळा आणि अजित पवार यांनी धरणातील पाण्यावर केलेले वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. आता तेच शस्त्र पुन्हा सत्ताधारी भाजपकडून काढण्यात आल्याचे दिसून येते. त्याला शिवसेनेची देखील साथ मिळताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. आता भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर टीका करताना पार्थ पवार केंद्रस्थानी होते. पार्थला उमेदवारी दिली नसती तर, अजित पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केले असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
एकंदरीत अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे.