एकीकडे मुंबईत भाजपाला उमेदवार सापडत नसल्याचे आरोप होत असताना दुसरीकडे भाजपाने विरोधकांना जोरदार धक्कातंत्राचा अनुभव दिला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे. भाजपाने १५ वी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये केवळ निकम यांचाच उल्लेख आहे. दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा देणाऱ्या निकमांना भाजपाने उमेदवार घोषित करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या मतदारसंघातून मविआने वेळ काढत माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पूनम महाजन यांना तिकीट देण्याचे टाळले होते. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपाने आपला तगडा उमेदवार जाहीर केला आहे. २०१६ मध्ये निकम यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आता मुंबईतही भाजपाने मविआला कांटे की टक्कर दिली आहे.