मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हिंगोली मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर युती होणार नाही, असे समजून त्यांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐनवेळी युती झाल्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली. दरम्यान काँग्रेसने विद्यमान खासदार सातव यांना डावलून काँग्रेसने ऐनवळी वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंगोलीच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे युतीकडून तेथील उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. त्यातच आता काँग्रेसने वानखेडे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील अकोल्यासाठी हिदायद पटेल, रामटेकसाठी किशोर गजभिये, चंद्रपूरसाठी सुरेश धानोरकर, हिंगोलीसाठी सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.