ऑनलाइन लोकमत
- दिग्गजांना घरातच धक्के : नागपूत जिल्ह्यात भाजप ५, काँग्रेस २, विदर्भ माझा १, नगर विकास आघाडी १
नागपूर, दि. 09 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची लाट ओसरल्याचे पहायला मिळाले. वरपासून खालपर्यंत सत्ता, जिल्हात भाजपा आमदारांचे प्रस्थ पाहता ९ पैकी ७ ते ८ जागी भाजपचे नगराध्यक्ष विजयी होतील, अशी अपेक्षा असताना ५ ठिकाणीच भाजपला यश आले. एकूण निकाल पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांना आपली प्रतिष्ठा कायम राखण्यात यश आले. मात्र, कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तर काटोल,नरखेडमध्ये भाजपचे आ.आशीष देशमुख यांना जबर धक्का बसला. रामटेकमध्ये शिवसेनेचा ‘आवाज’ काढण्यात भाजपला यश आले.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडाच्या नगराध्यक्षपदांवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारत राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का दिला आहे.गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सोनाली देशपांडे यांचा अवघ्या ९५ मतांनी विजयी निसटता विजय झाला. गोंदियात माजी नगराध्यक्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक इंगळे ५९४९ मतांनी विजयी झाले. तर तिरोड्यात भाजपच्या सोनाली देशपांडे यांना ५,९८७ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ममता आनंद बैस यांना ५ हजार ८९२ मते मिळाली. दोन्ही ठिकाणी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार दुसºया क्रमांकावर राहिले. गोंदियात राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन, काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांच्यासह भाजपच्या उमेदवारांसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले आणि तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावनेर, खापा, कळमेश्वरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांचाही फुगा फुटला. माजी मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, माजी आ. आशीष जैस्वाल यांनाही घरातच हादरे बसले. कामठी व मोहप्याने काँग्रेसची लाज राखली. तर काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’ व नरखेडमध्ये नगर विकास आघाडीने बाजी मारत भाजपला धुळ चारली. कामठीची निवडणूक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. येथे भाजप व माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत (बरिएमं) युती होती. बरिएमंचे अजय कदम यांनी भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर नगराध्यक्षाची निवडणूक लढविली. मात्र, काँग्रेसचे शहाजहाँ शफाअत यांनी त्यांचा पराभव केला. भाजपमधून बाहेर पडलेले विद्यमान उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांच्या उमेदवारीचा मोठा फटका भाजपला बसला. विधानसभा निवडणुकीतही बावनकुळे कामठीतून मागे होते, हे विशेष.शिवसेनेचे माजी आ. आशीष जैस्वाल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रामटेकच्या गडावरून शिवसेनेचा कडोलोट झाला. येथे शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा घेत भाजपने ‘बाण’ मोडीत काढला. भाजपला १७ पैकी १३ तर शिवसेनेला फक्त दोन जागा मिळाल्या. शिवसेनेने बिकेंद्र महाजन यांना उमेदवारी दिल्याने रमेश कारेमोरे यांनी बंडखोरी केली. याचा फायदा भाजपच्या दिलीप देशमुख यांना मिंळाला. देशमुख विजयी झाले. कारेमोरे दुसºया तर महाजन तिसºया क्रमांकावर सारले गेले. काँग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील सावनेर, खापा, कळमेश्वर या तिन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली. मोहपा येथे राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्यामुळे काँग्रेसची लाज राखल्या गेली. सावनेरमध्ये रेखा मोवाडे, खापामध्ये प्रियंका मोहटे व कळमेश्वरमध्ये स्मृती इखार यांनी कमळ फुलविले. मोहप्यात काँग्रेसच्या शोभा कऊटकर विजयी झाल्या.उमरेड येथे माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे गेल्या दहा वर्षांपासून असलेली सत्ता टिकवू शकले नाहीत. येथे भाजपने २५ पैकी १९ जागा जिंकल्या. भाजपच्या विजयलक्ष्मी भदोरिया यांनी काँग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर यांच्या पत्नी सुरेखा यांचा पराभव केला.काटोल व नरखेडमध्ये खºया अर्थाने देशमुखी मोडीत निघाली. माजी मंत्री अनिल देशमुख, भाजपचे विद्यमान आमदार आशीष देशमुख व शेकापचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांना आपला नगराध्यक्ष बसविण्यात अपयश आले. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या काँग्रेसला दोन्ही ठिकाणी खाते उघडता आले नाही. नरखेड येथे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अभिजित गुप्ता यांनी नगर विकास आघाडी स्थापन करून नगराध्यक्षपद जिंकले. मात्र, १७ पैकी ८ जागा जिंकत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप सेनेची युती असतानाही येथे भाजपाला खातेही उघडता आले नाही.काटोलमध्ये ‘विदर्भ माझा’- काटोलमध्ये भाजपातून बाहेर पडलेले चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या उमेदवारांना राजकुमार तिरपुडे यांच्या ‘विदर्भ माझा’ या पक्षाच्या चिन्हावर लढवित २३ पैकी १८ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर यांनी शेकापच्या अर्चना देशमुख यांना मात दिली. भाजपच्या डॉ. प्रेरणा बारोकर तिसºया क्रमांकावर राहिल्या. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनील देशमुख यांना येथे खातेही उघडता आले नाही. भाजपचे आ. आशीष देशमुख यांच्या गळाला फक्त एक जागा लागली. शेकापला चार जागा मिळाल्या. विदर्भाच्या नावावर नव्यानेच स्थापन केलेल्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने विदर्भवाद्यांचे मनोबल उंचावले आहे.