मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची घेतलेला पंगा भाजपला उखडून टाकणार,असा हल्लाबोल शिवसेनेने सामनातून केला आहे. ़
शिवसेनेला एनडीएमधून काढण्यात आले आहे. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये असलेले मतभेद आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना सुरुवातीपासूनच एनडीएमध्ये होती. यावर टीका करताना शिवसेनेला एनडीएमधून काढणारे तुम्ही कोण असा सवाल सामनामधून भाजपला करण्यात आला. ज्याने ही घोषणा केली, त्याला शिवसेनेचे मर्म आणि कर्म कळले नाहीत. ज्या काळात भारतीय जनता पक्षाच्या जवळही कोण फिरकत नव्हतं. त्यावेळी एनडीएची स्थापना झाली. त्याच एनडीएमधून शिवसेनेला काढण्याची नीच घोषणा केल्याचे म्हटले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीच्या दिवशीच शिवसेनेला एनडीएमधून काढण्याची घोषणा करण्यात आली. सर्वजण विरोधात गेली असताना मोदींचा बचाव करणाऱ्या संघटनेला एनडीएतून बाहेर काढण्यात आलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र मंबाजींना साथ देणार नाही. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा बांबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही पंगा घेणाऱ्यांना देत आहोत, असंही आग्रलेखात म्हटलं आहे.
राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत.