नाशिक - महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अपेक्षेनुरूप भाजपाच्याच हाती गेल्या असून उध्दव बाबुराव निमसे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या वतीने अपेक्षेनुरूप माघार झाल्याने निमसे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.आज दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी भाजपाकडून उध्दव निमसे तर शिवसेनेकडून कल्पना चंद्रकांत पांडे असे दोनच अर्ज होते. पैकी देशात आणि राज्यात युती झाल्याने आणि विधान सभा निवडणूकीत दुही नको याचे पथ्य पाळत शिवसेनेने अपेक्षेनुरूप माघार घेतली. आणि निमसे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांना विजयी घोेषित करण्यात आले.महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्यांपैकी भाजपाचे नऊ सदस्य असून शिवसेनेचे चार तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे गटाचे एकेक सदस्य आहेत. विरोधकांनी निमसे यांना आव्हान दिले नसले तरी शिवसेनेने मात्र दिले होते. शिवसेना लढणार असेल तर राष्ट्रवादी आणि अन्य विरोधकांनी त्यांना साथ देण्याची तयारी केली होती. मात्र तळ्यात मळ्यात राहणा-या शिवसेनेवर कोणालाही भरवसा नव्हता अखेरीस त्यांनी माघार घेतल्याने निवडणूक टळली असली तरी राष्ट्रवादीने तटस्थ राहण्यासाठी व्हीप बजावले होते. तर भाजपातदेखील अनेक इच्छूक नाराज झाल्याने दगा फटका होऊ नये यासाठी त्यांना देखील भाजपालाच मतदान करण्याचे व्हीप बजावण्यात आले होते.
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 2:43 PM