मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या आढाव्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. या वेळी पक्षाचे खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत़ केंद्रामध्ये एनडीएची सत्ता येणार असल्याच्या अंदाजाने भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. संभाव्य मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून कोण कोण मंत्री होणार याचीदेखील आता चर्चा सुरू झाली आहे. पाच महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठीची रणनीती आखली जाणार आहे. युतीमध्ये शिवसेना ही भाजपापेक्षा कितीतरी जास्त जागा लढविते. तथापि भाजपाने मिशन मुख्यमंत्री असे लक्ष्य समोर ठेवले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मुख्यमंत्री म्हणूनच परत येऊ, अशी घोषणा गोपीनाथ मुंडे यांनी आधीच केली आहे. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे युतीमध्ये आधीपासूनच ठरलेले आहे. त्यामुळे या वेळी गेल्या वेळपेक्षा जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल; आणि त्यानंतर शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून याव्यात, असेही भाजपाचे लक्ष्य असेल, अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. भाजपाच्या मिशन मुख्यमंत्री या मोहिमेकडे शिवसेना कसे पाहते, हेही महत्त्वाचे ठरेल. संख्याबळाअभावी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हातून गेल्याची सल अजूनही सेनेत आहे. (विशेष प्र्रतिनिधी)
राज्यात भाजपाची आगामी रणनीती ‘मिशन मुख्यमंत्री’!
By admin | Published: May 14, 2014 4:50 AM