ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 82 जागा हा आकडा अभिनंदन करण्यासारखा आहे. पण सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपाने हे यश मिळवले अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
जंग जंग पछाडूनही भाजपाला शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली.
असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता असे उद्धव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल असे उद्धव यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!
- मुंबईवर शिवसेना विजयाचा भगवा गुलाल उधळला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नक्कीच मुसंडी मारली आहे. पण जंग जंग पछाडूनही त्यांना शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेस ८४ जागांचा टप्पा गाठता आला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठोपाठ आला हे सत्य आम्ही नाकारणार नाही, पण शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली हे महत्त्वाचे. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता. मुंबईसह महाराष्ट्राच्या अखंडतेचा होता.
- अर्थात गेल्या पन्नास वर्षांपासून मुंबईवर आणि पंचवीस वर्षांपासून मुंबईच्या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होतीच. त्या सत्तेला व भगव्याला सुरुंग लावून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल. देशाच्या राजकारणात मुंबईचे एक वेगळे स्थान आहे. संपूर्ण देश मुंबईत सामावला आहे हे काही प्रमाणात खरे असेलही, पण तरीही मुंबईवर भूमिपुत्रांचा म्हणजे मराठी माणसांचाच पगडा राहिला. देशाचा कौल काय आहे ते मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केले. येथे ‘मन की बात’ चालत नाही तर फक्त ‘काम की बात’ चालते. शिवसेनेने मुंबईत विकासाचे काम केले. शिवसेनेने मुंबईचे सदैव संरक्षण केले. शिवसेनेने मुंबईत विश्वासाचे बीज पेरले. तो विश्वासच शिवसेनेला विजयाकडे घेऊन गेला. शिवसेना ८४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्षाला ८२ जागा मिळाल्या. अर्थात हाती संपूर्ण सत्ता व साधने असल्याचा जास्तीत जास्त लाभ भारतीय जनता पक्षाने पदरात पाडून घेतला. तरीही भाजपास मिळालेला ८२ चा आकडा हा अभिनंदन करण्यासारखाच आहे.
- काही झाले तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल. त्यासाठीच शेवटी ही लढाई झाली. मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व आहेच, पण ‘वॉर्डा’वॉर्डातील निकाल पाहिले तर सर्वच भाषिकांनी शिवसेनेला मतदान केले हे दिसून येते, पण भारतीय जनता पक्षाला विशिष्ट जात, धर्म आणि प्रांताचे ‘एकगठ्ठा’ मतदान झाले. तेच निर्णायक ठरले याची खंत आहे व निकालाची चिरफाड करण्यापेक्षा पुढच्या वाटचालीस आम्ही महत्त्व देतो. बहुमताचा संपूर्ण आकडा शिवसेनेस गाठता आला नाही. यापेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. त्याची कारणे तपासावी लागतील. शिवाय मुंबईतील १२ लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून ‘ठरवून’ झाला काय? अर्थात मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व आणि मुसंडी महत्त्वाची.
- जे झाले ते झाले, गंगेला मिळाले म्हणून वाहत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांतली शिवसेना नक्कीच नाही. महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे. मुंबईतल्या निकालांचे सविस्तर विश्लेषण नंतरही करता येईल. मुंबईसह इतर १० महानगरपालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या व तेथे बऱ्याच प्रमाणात प्रस्थापितांना धक्के बसले. ठाणे महानगरपालिकेत जंग जंग पछाडूनही भाजपला शिवसेनेचा पराभव करता आला नाही व ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता आणली. सोलापुरातही शिवसेनेने चांगला आकडा गाठला आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या महानगरपालिकांत भाजपने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. नागपूर तर भारतीय जनता पक्षाचा गड आहे व तेथे नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिष्ठा पणास लागली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का आहे.