मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?
By यदू जोशी | Published: December 9, 2023 08:29 AM2023-12-09T08:29:41+5:302023-12-09T08:30:18+5:30
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे
मुंबई : शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीसह (अजित पवार गट) विरोधी पक्षांचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नेते यांची कामे होत नाहीत, या नाराजीची दखल घेत आता भाजपचे आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये आपल्या माणसांची कामे तत्काळ व्हावीत यासाठी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी मुंबईत वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीकांत भारतीय यांना ओएसडी म्हणून नियुक्त केले होते व भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून जबाबदारी दिली होती. विधानसभेत गुरुवारी पुरवणी मागण्यांमध्ये सत्तारूढ आमदारांवर निधीची खैरात करण्यात आली होती.
संघाशी समन्वयाच्या म्हाळगी प्रबोधिनीत बैठका
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील समन्वयाच्या बैठका ९ आणि १० डिसेंबर रोजी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे काही पदाधिकारी यांची संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक ९ तारखेला होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्र्यांसोबतची बैठक १० तारखेला होणार आहे. संघ परिवारातील अन्य काही संघटनांसोबतही या दोन दिवसांत बैठका होतील.
भाजपची १६ ला बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा, विधानसभा प्रभारी यांची बैठक १६ डिसेंबरला नागपुरात होईल.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
कसा घेणार फॉलोअप?
भाजपजनांकडून आलेल्या कामांची विभागनिहाय यादी तयार केली जाईल आणि प्रत्येक मंत्र्याकडे ती कामे होण्यासाठी फॉलोअप घेतला जाईल. कोणती कामे झाली आणि कोणती नाही याचा अहवाल दर १५ दिवसांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिला जाणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांमधील भाजपजनांची जी कामे होणार नाहीत, त्याचीही माहिती फडणवीस व बावनकुळे यांना दिली जाईल.
समन्वय समितीची बैठक १४ ला नागपुरात होणार
भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक १४ डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या बैठकीत महामंडळे आणि विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नियुक्त्यांबाबत ५०:२५:२५ चा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. कोणती महामंडळे कोणाला याचा निर्णय होणे मात्र बाकी आहे.