पुणे : बीड जिल्ह्यातील अनिता विष्णू देवकुळे या मातेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या तीनही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती. तथापि, या मातेची तसेच तीन मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) उचलली असून, त्यासाठी त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे़ दिंद्रुड (ता. माजलगाव) गावाच्या रहिवाशी असलेल्या अनिता यांचे लग्न विष्णू देवकुळे (रा़ डोंबिवली पूर्व, मुंबई) यांच्याशी झाले. तिला तीन मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून नवरा, सासू-सासरे यांनी अनिता व तिच्या मुलींचा मोठ्या प्रमाणावर छळ केला़ या पार्श्वभूमीवर अनिता यांनी ९ जून रोजी मुख्यमंत्र्यांकडे तिन्ही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती.बीजेएसचे बीड येथील पदाधिकारी राजेंद्र मुनोत व गौतम खटोड यांनी अनिताच्या माहेरी भेट दिली असता अतिशय छोट्या घरात तीन मुलींसह अनिता राहत असल्याचे आढळले. डोंबिवलीवरून त्या नुकत्याच माहेरी आल्या होत्या. बीजेएसच्या कार्यकर्त्यांनी अनिताची आईव भावाशी चर्चा केली हीपरिस्थिती प्रत्यक्षात भयानक असल्याचे दिसून आले. घरातील सर्वांकडून आई व मुलींना होणाऱ्या त्रासाची माहिती या पदाधिकाऱ्यांनी घेतली. बीजेएसने या तीनही मुलींच्या इयत्ता पाचवी तेबारावीपर्यंतच्या शिक्षणाची तसेच अनिता यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीडवरून सोमवारी त्या पुण्याकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)बीजेएस सध्या महाराष्ट्रातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ७०० मुले-मुली तसेच मेळघाट व ठाणे परिसरातील ३०० मुले अशा एकूण १ हजार विद्यार्थ्याना शिक्षणासाठी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आणत आहे. त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी होत आहे़ आपण स्वत: अनिता व मुलीशी बोललो़ त्यांना खरोखरच त्रास होत असून मदतीची गरज असल्याचे लक्षात आले़ त्यामुळे तिन्ही मुलींच्या पुढच्या शिक्षणाची व अनिता यांना काम देण्याची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली आहे़ त्याला त्यांनी संमती दिली आहे़- शांतिलाल मुथा,संस्थापक, बीजेएस
बीजेएस घेणार ‘त्यांचे’ पालकत्व
By admin | Published: June 13, 2016 4:57 AM