सांगली- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी न्यायालयाच्या डान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या डान्स बारवरील बंदी उठवण्याचा हा निर्णय आल्यानं खूप वाईट वाटलं. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्याला वेगळा सांस्कृतिक वारसा आहे. असा सांस्कृतिक वारसा असताना डान्स बार बंदीसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देणं योग्य नाही. न्यायालयाचा निर्णय ही महाराष्ट्रासाठी खेदजनक बाब आहे.
आबांकडे गृहखातं असताना ते एखादे प्रकरण अभ्यास करून सोडवत असत. या डान्स बारमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आबांना समजल्यावर त्यांनी त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. काही लोकांनी सांसारिक कर्ज काढून डान्स बारमध्ये पैसे उधळले होते. तसेच डान्स बारमुळे एका महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचंही आबांनी पाहिलं होतं. तेव्हाच आबांनी महाराष्ट्रात डान्स बार बंदीचा निर्णय घेतला.डान्स बार बंदीचा निर्णय घेण्याआधी आबांनी सर्व्हे केला होता, त्या सर्व्हेत डान्स बारमध्ये नाचणाऱ्या 70 ते 80 टक्के मुली बांगलादेशी असल्याचं समोर आलं होतं. बांगलादेशी मुलींच्या उपजीविकेचं साधन महाराष्ट्रानं सरकारनं का शोधावं, असा प्रश्नही स्मिता पाटील यांनी उपस्थित केला आहे. डान्स बारसारख्या गोष्टींमुळे महाराष्ट्राची संस्कृती खराब होतेय. तसेच न्यायालयात या निर्णयाच्या बाजूनं पाठपुरावा करण्यास राज्य सरकार कमी पडल्याचंही स्मिता पाटील म्हणाल्या आहेत. कोण आहेत स्मिता पाटील ?स्मिता पाटील या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचा विवाह झाला आहे. या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचंही बोललं जातंय. आनंद यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केलं असून ते पुण्यात व्यवसाय सांभाळतात. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्मिता पाटील या अध्यक्षा आहेत.