ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेला बेळगाव 1956 सालापासून अखंड महाराष्ट्रापासून विलग आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली परंतु सीमाभागातील लोकांना अन्यायकारक कर्नाटक राज्यात डामले गेले. म्हणूनच 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्याचा राज्योस्तव दिन म्हणून साजरा होत असताना, मुंबईत मात्र अखंड महाराष्ट्राचा काळा दिवस ' म्हणून करी रोड नाक्यावरील मुंबई दरबार हॉटेल जवळ सकाळी ९.३० वाजता जाहीर सभा होणार आहे.
ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारली आहे. मात्र, तरीही सभा घेण्याचा निर्धार सीमा संघर्ष समन्वय समितीने व्यक्त केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, भौगोलिक सलगता, भाषावार प्रांतरचना, संस्कृती, बोलीभाषा या चार मुलभूत संविधानिक मुद्यावर बेळगांवसह आजुबाजूचे तालुके, गावे ही महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबईकर ज्या हुतात्मा स्मारकास वंदन करतात, त्या 105 हुतात्मांपैकी 2 हुतात्मे हे या सीमाभागतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी अखंड महाराष्ट्राच्या या लढ्यात सामील होण्याचे आवाहन समितीने केले आहे.