लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांनी घर बचाओ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढला. या मोर्चात वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा, पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर या परिसरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात व उत्स्फुर्त सहभाग होता. चिंचवड स्टेशन येथून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. बारा वाजता हा मोर्चा महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर याठिकाणीच ठिय्या मांडण्यात आला. घोषणाबाजी न करता शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चातील नागरिकांनी हातात काळे झेंडे घेत हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. महापालिका हद्दीच्या मध्यभागातून रिंगरोड प्रस्तावित आहे. या रस्त्याचा काही भाग पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील आहे. रिंगरोड करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने रिंगरोडची जागा मोकळी करण्याच्या तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात काळेवाडीफाटा येथे प्राधिकरणाने कारवाई करून रिंगरोडमध्ये येणारी घरे पाडली. दरम्यान, या रिंगरोडमध्ये शहरातील पिंपळेगुरव, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत गुरुद्वारा या परिसरातीलही घरे जाणार आहेत. यामुळे अनेकांना बेघर होण्याची वेळ येणार असल्याने या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे शासनाने रिंगरोडचे काम तत्काळ स्थगित करावे, अशी मागणी करण्यात आली.>आंदोलकांभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच वाहतूक सुरळीत रहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांनी दोन आठवड्यांपूर्वी प्राधिकरणावर भरपावसात मोर्चा काढून विरोध दर्शविला. त्यानंतर गुरुवारी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.>प्रशासनाला निवेदन‘घर आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, प्राधिकरण रद्द करा, आमची घरे नियमित करा, हे आमचे घर; पण त्यात घुसला प्राधिकरणाचा चोर’ अशा घोषणा फलक घेऊन नागरिकांनी भूमिका मांडली. त्यानंतर रिंगरोड रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले.
काळे झेंडे अन् काळ्या फिती
By admin | Published: July 14, 2017 1:48 AM