मुंबई : एका मनोरुग्णाला झाडाला बांधून त्याच्यावर अघोरी उपाय करणाऱ्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर काळी जादू प्रतिबंध कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ‘काळी जादू हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करता येणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिकेचा कर्मचारी एस. आर. कुंचीकोर्वे धारावी येथे एका मनोरुग्णाला झाडाला बांधून त्याच्यावर काळी जादू करीत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी या कर्मचाऱ्यावर ‘विशेष काळीजादू प्रतिबंध’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.‘हा कायदा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला. समजात पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, तसेच सामान्य माणसे या सर्व प्रकारापासून दूर राहावी, हे या कायद्याचे उद्दीष्ट आहे. काळ्या जादूद्वारे सामान्य माणसाचे शोषण केले जाते. त्यामुळे काळी जादू हा समाजाविरुद्ध केलेला गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने कुंचीकोर्वेला दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
‘काळी जादू हा समाजाविरुद्ध गुन्हा’
By admin | Published: March 09, 2016 5:32 AM