सिंधुदुर्गनगरी : अन्न, औषध, दुधामध्ये भेसळ करून काळाबाजार करणाऱ्यांना गजाआड केले जाईल, असा इशारा माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणकीय करण्याचे काम सुरू असून, बोगस कार्ड व लाभार्थ्यांचा शोध घेतला जाईल, असेही ते म्हणाले.गिरीष बापट हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, केंद्र सरकारकडून आपल्या विभागाला १०० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यातील गोदामांची समस्या लक्षात घेऊन तीन वर्षे पुरेल एवढा साठा करणारी गोदामे बांधण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पेट्रोल, डिझेल व रॉकेलच्या टँकरवर लवकरच ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे ती गाडी इंधन भरल्यापासून ते उतरेपर्यंत कुठे थांबते, किती वेळ थांबते, नियोजित मार्गात बदल होतो का, याची इत्यंभूत माहिती संगणकावर मिळणार असून, काळाबाजार आटोक्यात येण्यास त्यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काळाबाजार करणाऱ्यांना गजाआड करणार
By admin | Published: June 25, 2015 1:15 AM