पुणे : परदेशतील काही भारतीयांच्या बेनामी संपत्तीवरून गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रान उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता आल्यानंतर मात्र, संशयित बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या खात्यांचा साधा तपासही पूर्ण करता आलेला नाही. संशयित ६२८ खात्यांपैकी साडेआठ हजार कोटी रुपये असलेल्या ४१७ प्रकरणांचा तपास गेल्या पाच वर्षांत झाला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सकडे त्याबाबतची माहिती मागितली होती. फ्रान्स सरकारने २०१२ मध्ये स्विस बँकेत खाते असलेल्या ६२८ भारतीयांची जी यादी सरकारकडे दिली होती, त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. या खात्यातील ४१७ केसेसची तपासणी झाली असून, त्यातून ८ हजार ४६५ कोटी रुपयांचे काळे धन शोधले असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय इंटरनॅशनल कन्सोरशियम आॅफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआय) या संस्थेने सातशे भारतीयांची परदेशातील जी माहिती समोर आणली, त्यानुसार भारतीयांचे परदेशी बँकांमधील खात्यात ११ हजार १० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. भारतात आणि भारताबाहेर नक्की किती बेनामी संपत्ती आहे, याचा निश्चित आकडा नसल्याचे उत्तर डायरेक्ट टॅक्सेसने दिले आहे.याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा विरोधात असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रामदेवबाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा पैसा भारतात आल्यास विकासकामांना गती मिळेल, तसेच कराचे ओझे देखील कमी होईल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यादृष्टीने काहीच झाले नाही. उलट पूर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्स सरकारने दिलेल्या यादीनुसार खात्यांचा तपासही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यातील रकमेचा आकडा देखील अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तपासणी पूर्ण झालेल्या दोषी खातेदारांची नावेदेखील अजून, जाहीर केलेली नाहीत.
काळा पैसा परदेशातील बँकांमध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 1:58 AM