राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या सात गावांमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास विरोध करण्यासाठी सोमवारी दिवाळी पाडव्याला राजेवाडी व पारगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी काळ्या गुढी उभारून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला.गेली दीड महिन्यांपासून राजेवाडी, वाघापूर, आंबळे, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर या सात गावांतील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आम्हाला जमिनी द्यायच्या नाही. सरकारने बळजबरी करू नये, यासाठी आता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे ठराव देऊन विरोध केला आहे. तसेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांना हजारो शेतकरी महिलांचा मोर्चा काढून विरोध करून निवेदन दिले आहे. असे असतानाही जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. पारगावातील शेतकऱ्यांनी तर लाक्षणिक उपोषण करून विरोध केला. तसेच सात गावातील ऐन दिवाळीत बोंबाबोंब करून शिमगा केला. आम्हाला सरकारने सगळी तिजोरी रिकामी केली, तरी आम्ही इंचभर जमिनी देणार नसल्याचे सुषमा मेमाणे व दीपक मेमाणे यांनी सांगितले. आम्हाला विमानतळ नको, आम्हाला फक्त पुरंदर उपसा योजनेचे पाणी द्या, असे राजेवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले. मोजणी करून दिली जाणार नाही. आम्ही जिल्हाधिकारी यांना ग्रामसभेचे ठराव दिले आहेत. ग्रामसभा ही सर्वोच्च असल्याने जिल्हाधिकारी यांनी ग्रामसभेचे महत्त्व जाणावे. ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करू नये, असे राजेवाडीतील सरपंच पुष्पांजली बधे व पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे यांनी सांगितले.
विमानतळाच्या विरोधात उभारल्या काळ्या गुढ्या
By admin | Published: November 02, 2016 1:05 AM