सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूरचा दौरा करणार आहेत. विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोदी सोलापूरला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. मात्र प्रशासनाकडून यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींच्या दौऱ्याआधी सोलापूरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी आंदोलनं करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली. मात्र काँग्रेसच्या आंदोलनांना प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. 'जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं होणार आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक जण रस्त्यावर उतरणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे तेदेखील सरकारचा निषेध करणार आहेत. याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळाल्यानं दडपशाही सुरू आहे,' असा घणाघाती आरोप त्यांनी केला. उद्याचा दिवस सोलापूरकरांसाठी काळा दिवस असेल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. 'उद्या शहरातील केबल सेवा बंद असणार आहे. मोदींच्या दौऱ्याआधी शहरात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे,' असा दावा त्यांनी केला. मोदींनी देशातील जनतेची निराशा केल्याचं त्या म्हणाल्या. '2014 मध्ये लाट होती. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी जनतेला प्रचंड आश्वासनं दिली होती. त्यामुळे मतदारांना मोठी आशा होती. मात्र मोदींनी जनतेची निराशा केली. मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, हे आता लोकांना कळून चुकलं आहे,' अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली.
मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरात ब्लॅक आऊट; प्रणिती शिंदेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 4:30 PM