लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचे ‘आमची ड्राईव्ह’ हे अॅप अखेर गुरुवारी दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे परिवहन विभागाचे प्रतिनिधी म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांच्या हस्ते अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपमुळे ओला-उबरच्या धर्तीवर काळी-पिवळी टॅक्सीही एका क्लिकवर बुक करता येणार आहे.‘आमची ड्राईव्ह’ अॅपमुळे तब्बल शतकाहून अधिक काळ मुंबईकरांना सेवा पुरवणारी काळी-पिवळी टॅक्सी आता स्मार्ट टॅक्सी म्हणून ओळखली जाणार आहे. या कार्यक्रमावेळी टॅक्सी युनियनचे अध्यक्ष एल.के. क्वाड्रोस आणि टॅक्सी युनियनचे नेते प्रेमसिंग उपस्थित होते. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अनुपस्थितीत आणि ससाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.ओला-उबरच्या स्पर्धेत अॅप-बेस टॅक्सी सेवेत काळी-पिवळी टॅक्सी मागे पडत होती. परिणामी काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांनी अॅप-बेस सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून या अॅपवर काम सुरू होते. अखेर हे अॅप प्रत्यक्षात उतरले असून अॅपमध्ये प्रवासी भाडे रोख स्वरूपात आणि ई-वॉलेटच्या स्वरूपात देण्याची सोय आहे. बंगळुरूस्थित खासगी कंपनीने हे अॅप तयार केले आहे.देशात इमानदार टॅक्सीचालक म्हणजे मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सी अशी ओळख आहे. मात्र काही ५ ते १० टक्के टॅक्सीचालकांमुळे काळी-पिवळी सेवा बदनाम होत असल्याची खंत टॅक्सी युनियनचे अध्यक्ष क्वॉड्रोस यांनी व्यक्त केली. या अॅपमुळे प्रवाशांना कुठे जायचे आहे? हे सांगणे बंधनकारक नाही. टॅक्सीत बसल्यानंतर चालकाला कुठे जायचे आहे, ते ठिकाण सांगायचे आहे. त्यामुळे टॅक्सी चालकांचे भाडे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अॅपमध्ये भाडे दरपत्रक (रेटकार्ड) असल्याने वाढीव भाड्याचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रवाशांकडून ५ रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे क्वाड्रोस यांनी सांगितले.अॅप कसे वापराल?-अॅप डाऊनलोड केल्यानंतर वातानुकूलित किंवा विनावातानुकूलित अशी टॅक्सी निवडावी.नोंदणी केलेल्या टॅक्सीमध्ये ‘आमची ड्राइव्ह’ असे स्टीकर चिकटवण्यात येईल.आतापर्यंत २ हजारांहून अधिक टॅक्सींची नोंदणी अॅपमध्ये करण्यात आली आहे.साध्या टॅक्सीसाठी पहिल्या दीड-किलोमीटरसाठी २२ रुपये शुल्क आकारण्यात येईल.दरपत्रकाप्रमाणे प्रवाशांनी भाडे द्यावे.इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर रोख रक्कम किंवा ई-वॉलेटच्या मदतीने भाडे देता येईल.
काळी-पिवळी टॅक्सी झाली ‘स्मार्ट’
By admin | Published: June 30, 2017 1:52 AM