उरण : गेल्या दोन दिवसांपासून उरण शहर आणि परिसरातील काही भागांत काळा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तीन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसामुळे उरणजवळच्या बुचर आयलॅण्डवरील तेल साठ्यांच्या टाक्यांवर वीज कोसळली होती. यामुळे तेथील भीषण आगीत २०० कोटींचा तेलसाठा जळून खाक झाला. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळनंतर उरण परिसरातील काही भागांत काळा पाऊस पडल्याची घटना घडली आहे. उरण शहर आणि नजीकच्या नागाव, केगाव आणि इतर परिसरातील गावांत कोसळलेल्या काळ्या पावसामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.उरण परिसरात कोसळलेल्या काळ्या पावसाचा संबंध बुचर आयलॅण्डवर तेलाच्या टाकीला लागलेल्या भीषण आगीशी जोडला जाऊ लागला आहे. कारण या भीषण आगीतील काळ्या धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत होते. तीन दिवस हवेत मिसळलेल्या, पसरलेल्या त्या धुरामुळे वातावरणात बदलाची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे. मात्र याआधीही रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी काळा पाऊस पडल्याच्या घटना घडल्याचेही उघडकीस आले आहे.नमुने प्रयोगशाळेत पाठवले-उरणमध्य पडलेल्या काळ्या पावसाच्या पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत वैज्ञानिक पृथकरणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यावर अधिकृत माहिती मिळेल.दोन दिवसांपूर्वी बुचर आयलॅण्ड येथील तेलटाकीवर वीज पडली होती. त्या वेळी निर्माण झालेल्या ‘हेवी स्मोक’चे प्रमाण अधिक असणारा धूर परिसरात होता. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण या दिवसांत अधिक असल्याने हे कार्बन कण पावसाबरोबर खाली आल्याने पावसाचे पाणी काळे दिसत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उरणमध्ये पडला काळा पाऊस , नमुने प्रयोगशाळेत पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:58 AM