मुंबई : उत्तम शिक्षण आणि चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणाऱ्या आयआयटी मुंबईची नऊ कंपन्यांनी फसवणूक केली आहे. खोट्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या या कंपन्यांना आयआयटी मुंबईने काळ््या यादीत टाकले आहे.आयआयटी मुंबईत दरवर्षी विविध अभ्यासक्रमाचे धडे घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अनेक कंपन्यांकडून प्लेसमेंटची आॅफर देण्यात येते. मात्र, यंदा त्यामध्ये फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या आॅफर्स येऊनही प्रत्यक्षात नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे पुढचे पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात आली असता, काही कंपन्या बोगस असल्याचे समोर आले.आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या ९ ब्लॅक लिस्टेड कंपन्याची यादी जाहीर केली आहे. यात ‘लिग्रेड बर्नेट ग्रुप’, ‘जीपीएसके’, ‘जॉन्सन इल्ट्रीक चाईना’, ‘पोर्टल मेडिकल’, ‘पेपरटॅप’, ‘कॅशकेअर टेक्नॉलॉजीस’, ‘लेक्सइनोव्हा’ आणि ‘इंडसइनसाइट’ या कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले होते. मात्र, ते प्लेसमेंट अचानक रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे यातील काही कंपन्यांचे पत्ते आणि इतर माहिती चुकीची आहे, तर काही कंपन्यांनी प्लेसमेंट दिली नसून, विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवले आहे. (प्रतिनिधी)
चुकीची माहिती देणाऱ्या कंपन्या काळ्या यादीत; आयआयटीची कारवाई
By admin | Published: August 26, 2016 6:54 AM