महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका कॅब ड्रायव्हरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा कॅब ड्रायव्हर महिलांची सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करून त्यांचे मॉर्फ फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळायचा. आतापर्यंत त्याने २४ महिलांची सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या कॅब ड्रायव्हरचं नाव अजय उर्फ विनोद किशनराव मुंडे असल्याचं समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुंडे हा फेसबूकवर महिलांना एक लिंक पाठवायचा. त्यावर क्लिक केल्यावर आरोपी त्या महिलांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करायचा. त्यानंतर पैसे उकण्यासाठी त्या महिलांना त्यांचे फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायचा.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, एकदा कुठलाही विचार न करता महिलांचं फेसबूक अकाऊंट अॅक्सेस केल्यानंतर तो त्या महिलांच्या मित्रमैत्रिणींनाही लिंक पाठवायचा. तसेच त्यांचीही खाती हॅक करायचा. त्यानंतर हा आरोपी त्या महिलांना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले असल्याचे सांगून ब्लॅकमेल करायचा. तसेच हे फोटो हटवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागायचा.
आरोपी हा महिलांना ब्लॅकमेल करताना त्यांच्याकडून ५ ते १० हजार रुपयांची मागणी करायचा. कमी रकमेची मागणी केल्यास महिला पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत, असा त्याचा अंदाज होता. मात्र तरीही ३ महिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आरोपील लातूर येथून बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी कॅब ड्रायव्हर असून, तो लातूर, नांदेड, परभणी या ठिकाणी सतत फिरतीवर असायचा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन आणि मुंबईतील एका महिलेने आरोपीविरोधात तक्रार दिली होती. तपासादरम्यान २४ महिलांकडून त्याने ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. कोरोनातील लॉकडाऊनदरम्यान उत्पन्नाचं कुठलं साधन नसल्याने आरोपीने सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यास सुरुवात केली होती. आता त्याच्याविरोधात फसवणूक, वेश बदलून फसवणूक करणे, माहिती तंत्रज्ञान कायदा आदि कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.