मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय कागदपत्रांत फेरफार केल्याचे समोर येताच कारागृह विभागाने डॉ. राहुल घुले यांची मुंबई मध्यवर्ती कारागृहाकडील प्रतिनियुक्ती रद्द करून आरोग्य विभागात रवानगी केली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी भुजबळ यांना कारागृहाबाहेर पाठविण्यास नियमबाह्य मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपीनकुमार सिंग यांनी ही माहिती दिली. भुजबळ यांचा दात व जबडा दुखत असल्याने १६ एप्रिलला कारागृहातील दवाखान्यात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. एक्सरे व इतर तपासणी करून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या दंत चिकित्सा बाह्यरुग्ण विभागात (डेंटल ओपीडी) पाठवण्यात यावे, अशी नोंद नोंदवहीत करण्यात आली. १८ एप्रिलला भुजबळ यांना सेंट जॉर्ज येथे ओपीडीकरिता नेत असताना कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. घुले यांंनी भुजबळ यांच्या कागदपत्रांतील नोंदीसमोर वैद्यकीय बाह्यरुग्ण विभाग (मेडिकल ओपीडी) असे नमूद केले. त्यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. शिवाय वरिष्ठांना माहिती देण्यात आली नाही. कारागृह मुख्यालयाकडील दक्षता पथकामार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब उघड झाली. डॉ. घुले यांनी भुजबळ यांना कारागृबाहेर पाठविण्यास नियमबाह्य मदत केल्याचे या चौकशीतून स्पष्ट होत असल्याचे कारागृह विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार डॉ. घुले यांची मुंबई मध्यवर्ती कारागृहाकडील प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना आरोग्य विभागात पाठविण्यात आले. घुले यांच्यावर आरोग्य विभागामार्फतही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे बिपीनकुमार सिंह यांनी म्हटले आहे. भुजबळ यांना दंत उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र भुजबळ रुग्णालयात येताच कागदपत्रांतील फेरफारामुळे त्यांच्या छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल केले. याबाबत तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र धामणे चौकशी करणार असून, ते सोमवारी गृहखात्याकडे अहवाल सादर करतील. घुले यांनी कारागृहाच्या अधीक्षकांबाबत केलेल्या तक्रारीचीही शहानिशा करण्यात येणार असल्याचे धामणे यांचे म्हणणे आहे. अद्याप लेखी तक्रार आपल्याकडे आली नसल्याचे सिंह यांनी सांगितले. छगन भुजबळ वॉर्डमध्येमुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलवण्यात आले. अजूनही त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती सामान्य झालेली नाही. त्यामुळे पुढचे ४८ तास त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर (हॉल्टर मॉनेटरिंग) लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रोहन सिक्वेरा यांनी दिली. जे. जे. रुग्णालयातील ४ डॉक्टारांची चमू गुरुवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात आली होती. गुरुवारी छगन भुजबळ यांचा ‘टू डायमेंशन इको’ काढण्यात आला. या अहवालानुसार भुजबळांच्या आरोग्याला धोका नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. उपचारासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असेही डॉ. रोहन यांनी स्पष्ट केले. भुजबळांना १८ एप्रिलला आर्थर रोड कारागृहात दात दुखणे आणि छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी भुजबळ यांचा रक्तदाब १२०-१८० इतका वाढला होता. त्यांच्या पायाला सूज आली होती आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागातून हलवले असले तरीही निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
भुजबळांना मदत केल्याचा ठपका : घुले यांची रवानगी आरोग्य विभागात
By admin | Published: April 23, 2016 3:37 AM