पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आहे़. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली़.यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद (रा़. भटकळ, जि उत्तर कन्नडा, कर्नाटक) याच्यावर देशातील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे़. त्याला ऑगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती़.विविध न्यायालयात खटले सुरु असल्याने व सुरक्षाच्या कारणावरुन त्याला इतके दिवस पुण्यातील न्यायालयात हजर करता आले नव्हते़. सुरक्षेच्या कारणावरुन त्याला प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी द्यावी, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते़. त्याला यासीनचे वकील जहीरखान पठाण यांनी विरोध केला व त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करुनच खटल्याची सुनावणी सुरु करावी, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात केली होती़. त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे़. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला होता, तर ५६ जण जखमी झाले होते़ .मृतांमध्ये ५ व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता़. या गुन्ह्याचा तपास एटीएसने करुन त्यात मिर्झा हिमायत इनायत बेग याला ७ सप्टेंबर २०१० रोजीअटक केली होती़. त्याच्यावर खटला चालविण्यात येऊन सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती़. उच्च न्यायालयात त्याची फाशीची शिक्षा कमी करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे़. या गुन्ह्यात यासीन भटकळ हा मुख्य आरोपी आहे़. त्यानेच जर्मन बेकरीत एक बॅगमध्ये टायमरचा वापर करुन बॉम्ब ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट केल्यानंतर तो फरार झाला होता़. इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ़ यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत यासीनला नेपाळच्या सीमेवरील सौनाली या गावातून मार्च २०१४ मध्ये अटक केली होती़. त्याचा ताबा १३ मार्च २०१४ रोजी एटीएसकडे सोपविण्यात आला होता़. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या खटल्यात यासीन याला यापूर्वी १४ मार्च २०१४ रोजी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते़. त्यानंतर न्यायालयातील ८० हून अधिक सुनावणीला त्याला हजर करण्यात आले नव्हते.
........
* यासिन भटकळ वर करण्यात आलेय या कलमांनुसार आरोप निश्चित:
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात यासीन भटकळ याला आज हजर करण्यात आले़. त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले़. सरकारपक्षाने सादर केलेल्या दोषारोपानुसार त्याच्यावर भादंवि कलम ३६०, ३०२, ३२५, ३२६, ३२४, ४२७, १२० ब, ४६७, ४६८, ४७४, १५३अ, युएपीए कायदा कलम १०, १३, १६, २१ या अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले़. त्याच्यावर देशद्रोहाच्या आरोपासह कट रचणे, खुनासह बनावट कागदपत्रे तयार करणे असे आरोप त्यावर ठेवण्यात आले आहेत़.
........
* कोण आहे यासिन भटकळ
मोहम्मद अहमद सिद्दीबप्पा उर्फ यासिन भटकळ (वय ३६,रा. भटकळ, उत्तर कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे भटकळमध्ये झाले. तो दहावीत नापास झाल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये दुबईला गेला. जानेवारी २००७ मध्ये तो दुबईतून गायब झाला. काही वर्षांपूर्वी त्याने नवी दिल्ली येथे झहिदा नावाच्या मुलीशी विवाह केला. २०१० पासून तो नेपाळच्या पोखरा येथील युनानी डॉ. शाहरुख याच्या हाताखाली काम करत होता. तो इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक सदस्य आहे.