ऑनलाइन टीम
पुणे, दि. २४ - महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे महाराष्ट्राच्या थोर परंपरेला डाग लागल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या घटनेची चौकशी सुरु असून आता या खासदारांवरील कारवाईचा अंतिम निर्णय संसदीय कार्यमंत्री आणि लोकसभा - राज्यसभेचे पीठासीन अधिकारी घेतील असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र सदनातील वादाविषयी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र सदनात उपलब्धतेनुसार खासदारांना रुम देण्यात आल्या होत्या. यात दुजाभाव करण्याचा प्रयत्न नव्हता. शिवसेना खासदारांनी सदनातील मुस्लीम कँटिन मॅनेजरला त्याचा रोजा असतानाही चपाती भरवली. हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून दिल्ली पोलिसांनीही घटनेची देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र सदनातील कँटिनविषयी तक्रारी येत असल्याचे चव्हाण यांनी मान्य केले. महाराष्ट्र सदनातील कँटिनसाठी ठेकेदार मिळत नसल्याने आम्ही आयआरसीटीसीला कँटिन चालवायला दिले. पण नवीन ठेकेदाराचा शोध सुरु असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी दोन्ही पक्षाांना न्याय देणारा निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.