मुंबई : काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने देशातील १२ लाख लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. गोल्ड क्वेस्ट, क्वेस्ट नेट, क्यू नेट आदी कंपन्यांच्या नावावर मल्टिलेव्हल मार्केटिंगचा वापर करून विजय ईश्वरन या श्रीलंकन व्यक्तीने कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माधव भांडारी बोलत होते. जन्माने श्रीलंकन असणारी विजय ईश्वरन ही व्यक्ती स्वत:ला परदेशस्थ भारतीय (एनआरआय) असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत आहे. ३० हजार रुपयांना एक डिस्क विकण्यात आली. भाभा अणुसंशोधन केंद्रात या डिस्कची तपासणी केली असता ती केवळ सामान्य काचेची असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे. यावरून केवळ ३० रुपयांची ही डिस्क ३० हजार रुपयांना विकण्यात आली. १२ लाख लोकांकडून या कंपन्यांनी १ ते ३ लाख रुपये गोळा केले. या कंपनीशी संबंधित विहान डायरेक्ट सेलिंग इंडिया या कंपनीचे एक मालक विख्यात क्रीडापटू मायकेल परेरा यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. परेरा हे गांधी कुटुंबीयांच्या अतिशय जवळचे आहेत. संपुआ सरकारने या प्रकरणी कोणतीही पावले उचलली नाहीत. हे प्रकरण दडपण्यात आले. (प्रतिनिधी)
‘माजी मंत्र्यांच्या आशीर्वादाने लोकांना गंडा’
By admin | Published: May 01, 2016 2:00 AM