गखेट्री/मळसूर (जि. अकोला): शेतीच्या वादातून सावत्र अंध भावाची हत्या करण्यात आल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरुवारी रात्री घडली. जगदेव किसन कंकाळ (वय ५0) हे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून, या प्रकरणी सुखदेव किसन कंकाळला अटक करण्यात आली आहे. जगदेव कंकाळ हे दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. कंकाळ कुटुंबाकडे ५ एकर शेती होती. शेतीवरून जगदेव व अकोला येथील मलकापूर येथे राहणार्या सुखदेव कंकाळ या सावत्र भावामध्ये दोन वर्षांपासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. सुखदेवने जगदेववर राप्टरने हल्ला केला. या हल्ल्यात जगदेव जबर जखमी झाले. त्यांना तातडीने मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हत्येची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, चान्नीचे ठाणेदार विष्णुकांत गुट्टे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी सुखदेव कंकाळविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
शेतीच्या वादातून अंध भावाची हत्या
By admin | Published: July 25, 2015 1:56 AM