कल्याण : एकीकडे बेकायदा बांधकामांच्या कारवाईकडे कानाडोळा केला जात असताना दुसरीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्याचे घर पाडण्याचा प्रताप कल्याण-डोंबिवली महापालिकेने केला आहे. हा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर परिसरात घडला आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्याच माधव महाजन या ८४ वर्षीय अंध निवृत्त कर्मचाऱ्याला कुटुंबासह बेघर व्हावे लागले आहे.महाजन हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. वार्धक्यात डोळ््याच्या झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची दृष्टी गेली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कर्वेरोडवरील विष्णुनगर परिसरात त्यांच्या मालकीचे घर आहे. १९७४ पासून त्यांचे कुटुंबासह याठिकाणी वास्तव्य आहे. घर नादुरुस्त अवस्थेत असल्याने त्यांनी रितसर महापालिकेत दुरुस्तीसाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे त्यांनी दुरुस्तीचे काम केले होते. परंतु, हे काम पूर्ण केल्यानंतर कोणतीही नोटीस न देता त्यांचे बांधकाम ‘ह’ प्रभागातर्फे तोडण्यात आल्याचे महाजन कुटुंबाचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे बेघर झालेल्या महाजन यांनी तात्पुरता मुलगा किरण याच्या मित्राकडे सहारा घेतला आहे.किरण यांनी महापालिकेच्या या कारवाई विरोधात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांना देखील न्यायासाठी साकडे घातले आहे. यानंतर किरण यांनी पुन्हा बांधकाम उभे केले आहे. मात्र मंगळवारी सुट्टीच्या दिवशी बांधकामाच्या ठिकाणी येऊन ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी शरद पाटील यांनी काम थांबवण्याबाबत सांगितल्याचे त्यांनी सांगितले. आजुबाजुला मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असताना आमच्याच गरीबाच्या घरावर डोळा का?, असा सवाल त्यांनी केला आहे. आम्हाला या घरा व्यतिरिक्त कोठेही घर नाही. त्यामुळे आम्ही बेघर झाल्याची व्यथा त्यांनी ‘लोकमत’कडे मांडली. (प्रतिनिधी) >महाजन यांनी केले वाढीव बांधकामया संदर्भात प्रभाग अधिकारी शरद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता दुरुस्तीच्या नावाखाली महाजन यांनी वाढीव बांधकाम केले होते. त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. याबाबत आयुक्तांकडे तक्रार आली होती. त्यानुसार कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंध निवृत्त कर्मचारी झाला बेघर
By admin | Published: April 05, 2017 4:05 AM