ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील पादचारी पुलाचा ६० फुटी सांगाडा टाकण्याचे काम करायचे आहे. यासाठी येत्या शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे साहाय्यक आयुक्त पी. व्ही. मठाधिकारी यांनी दिली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ (मुंबई-नाशिक महामार्ग) येथे विवियाना मॉलसमोर पादचारी पुलाचे काम सुरू आहे. यासाठी तयार केलेला ६० फुटांचा लोखंडी सांगाडा ठेवण्याचे काम ९ व १० एप्रिलला करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील कॅडबरी उड्डाणपूल ते माजिवडा उड्डाणपुलाची वाहतूक वळवण्यात येणार आहे. मुंबईकडून नाशिक-घोडबंदर मार्गावरून जाणारी वाहने कॅडबरी ब्रिजवर न चढता नितीन, कॅडबरी जंक्शन येथून सर्व्हिस रोडमार्गे पुढे जातील. तसेच घोडबंदर-नाशिकमार्गे मुंबई दिशेने जाणारी वाहने माजिवडा व कापूरबावडी उड्डाणपुलाचा वापर न करता गोल्डन डाइज जंक्शन, संकल्प हाइट सर्व्हिस रोडमार्गे जाणार आहेत. या कामासाठी ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त जास्त वेळ लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवार, रविवारी ब्लॉक
By admin | Published: April 07, 2016 2:35 AM