स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती.... महिलांनी शिकावं, समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनिष्ठ रुढी मोडून स्वतः प्रगल्भ व्हाव, हा त्यामागचा मुळे उद्देश. सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना यश मिळालेले पाहायला मिळत आहे. आज जगभरात अनेक कर्तृत्ववान महिलांचे दाखले दिले जात आहेत. 2019वर्षाचा निरोप घेताना केलेल्या भ्रमंतीत मला ही सावित्रीची लेक सापडली. नव्या वर्षाचे स्वागत करताना तिची आणि माझी भेट होणे, हा केवळ योगायोग नक्कीच नव्हता.
अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली. हे वाक्य जेव्हा कानी पडलं, तेव्हा आनंदासमोर गगन ठेंगणे नक्की झाले होते. आज आपल्या सर्वांच्या ओळखीत असा अनेक मित्रपरिवार आहे, की ज्यांना पहिली मुलगी ( किंबहुना एकुलती एक ) आहे. प्रत्येकजण एका मुलीचा बाप आहे, हे अभिमानाने सांगतो. मुलगा होईपर्यंत प्रयत्न करत ( ३-४ मुली झाल्या तरी चालेल) राहण्याचा काळ गेला. वंशाचा दिवा हवा, पण मुलगी नको. पण आता हा भेदभाव राहिला नाही? असा माझा आतापर्यंतचा गैरसमज त्या एका घटनेनं दूर केला. सोशल मीडियावर आपल्याला मुलगी झाली हे अभिमानाने सांगणाऱ्या बापांची संख्या वाढतेय, असा समज होता. पण आपली फ्रेंडलिस्ट कदाचित लेकलाडक्या बापांची भरली आहे, त्यामुळे हेच चित्र खरं आहे असं वाटत होते.
मला मुलगी झाली तेव्हा ही गोड बातमी सर्वप्रथम देणाऱ्या नर्सच्या चेहऱ्यावरील नाखुशीकडे दुर्लक्ष केले. एक स्री असून 'मुलगी झाली' हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील भाव मनात राग निर्माण करणारे होते. समाज बदलतोय हे खरं आहे, पण केवळ सुशिक्षित समाज बदलला आहे आणि तोही काही प्रमाणात. पण ग्रामीण भागात आजही चित्र पूर्वी सारखच आहे.वर्षाअखेरच्या एका ट्रिपनं हे वास्तव समोर आणले.
कुटुंबासोबत अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या लहानशा खेडे गावात जाण झाली. तेथेच माझी गाठ एका चिमुरडीशी पडली. तिची आणि माझी ही पहिलीच भेट. दीड दोन वर्षांची असेल ती. सावळी, गुबगुबीत, बडबडी, तिच्या बोलण्यातला गोडवा मनाला तृप्त करणारा, पेग्वीन सारखी लुटूपुटू चालणारी, बिनधास्त. काही मिनिटात तिनं आपलसं केलं. तिला सर्व लाडानं परी म्हणतं होते. त्यामुळे आम्हालाही याच नावानं तिची ओळख.
पण, त्या निरागस चेहऱ्यामागे एक कटू सत्य दडलं होतं. ते नसतं समजलं तरच बरं झालं असतं. एखादा बाप इतका निष्ठुर कसा असू शकतो? मुलगी झाली म्हणून तिच्या बापानं तिला सोडलं होतं. हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्याचं कळताच तो बाप तिथून निघून गेला. तिचं तोंडही पाहणं त्याला गरजेचं वाटलं नाही. हे जेव्हा मला कळलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आतापर्यंत लेकलाडक्या बापांचे चित्र मला जो आरसा दाखवत होता, त्या मागच्या या दुसऱ्या वास्तवापासून अनभिज्ञ होतो.
मुलगा झाला असता तर मी त्याला सांभाळले असते, मुलगीला तूच सांभाळ, तिचा माझा काही संबंध नाही, असं सांगून कसा एक बाप पत्नी आणि मुलीला सोडू शकतो. त्याहून वाईट याचा स्वीकार करणे. का हा अन्याय गपगुमान सहन करतात? का नाही पोलिसात तक्रार करत? जर बापावीनाच पोरीला वाढवायचं आहे, मग टाका त्याला तुरुंगात; तसं का नाही केले? असे अनेक प्रश्न उभे राहिले आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर समाज काय म्हणेल, हे उत्तर मिळाले.
जर एखाद्या महिलेने त्याच्या पत्नीला जेलमध्ये टाकले तर, समाज काय म्हणेल... पण त्याच पतीनं जेव्हा मुलगी झाली म्हणून पत्नीसह त्या चिमुरडीला सोडलं तेव्हा हाच समाज काय करत होता? मनातला राग मीच जाणत होतो. पण थोडा विचार केला, त्या नालायक बापाकडे परी नाही हेच बरं. निदान ती तिच्या आईसोबत सुरक्षित आहे.. तिच्या मामाचे, आजी-आजोबांचे कौतुक. परीला ते तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत आहेत. आज आपण 2020मध्ये प्रवेश केला आहे, परंतु खेड्यापाड्यात अजूनही 1800 च्या दशकाच्या रुढींचाच पगडा पाहायला मिळत आहे. सावित्रिची लेक अजूनही सावत्रच आहे.