- देवेश फडके
कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या इतिहासातील चमत्कार मानला जातो. अतिशय खडतर परिस्थिती, अगणिक आव्हानांना, असंख्य समस्यांना आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोकण रेल्वे सुरू झाली. कोकण रेल्वेच्या गेल्या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात अनेक स्थित्यंतरे आली. कोकण रेल्वेही प्रगत होत गेली. कोकण प्रदेश आणि कोकण रेल्वेच्या या गतिमान विकासाचा आता एक नवा अध्याय सुरू झाला आहे. तो म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. भारतीय रेल्वेने हायस्पीड रेल्वेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘टॅल्गो’ ट्रेनची चाचणी देशातील काही मार्गांवर केली होती. टॅल्गोचे स्वप्न काही साकार होऊ शकले नाही. मात्र, भारतीय रेल्वे खचून गेली नाही. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागून भारतीय रेल्वेला साजेशी अशी 'ट्रेन-18' लाँच केली. त्याचेच पुढे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात आले. आता हीच वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई – गोवा या कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाचवेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करण्यात आले. यातील एक वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई – गोवा म्हणजेच, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव या मार्गावर धावणार आहे. आताच्या घडीला देशभरातील मार्गांवर १८ वंदे भारत एक्स्प्रेस सेवेत आहेत. या पाच ट्रेनच्या लोकार्पणानंतर देशातील वंदे भारत ट्रेनची संख्या २३ वर गेली आहे. मुंबईतील ही चौथी आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावरील ही वंदे भारत ट्रेन ८ डब्यांची आहे. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, मुंबई ते मडगाव या दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा असेल. तर मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू राहील. मात्र, कोकण रेल्वेचे नियमित वेळापत्रक सुरू झाले की, या वंदे भारत ट्रेनची सेवा विस्तारणार असून आठवड्यातील शुक्रवार वळगता अन्य दिवशी दररोज ही सेवा प्रवाशांसाठी सुरू राहणार आहे.
भारतीय रेल्वेवरील असाध्य ते साध्य करून दाखवणारा चमत्कार म्हणजे कोकण रेल्वे
मुंबई ते मंगलोर, कोकण, गोवा व कर्नाटक, केरळच्या तसेच दक्षिण भारतातील किनाऱ्यावरच्या गावांसाठी थेट रेल्वेची सोय नव्हती. प्रवाशांना त्या भागात जायचे असेल तर पुणे-बेळगाव-बंगळुरूमार्गे जाणाऱ्या ट्रेनने जावे लागायचे. मात्र, यानंतर रेल्वे मंत्रिमंडळाने सुरतकल ते मडगाव आणि त्यानंतर मडगाव ते रोहा या मार्गावर सर्व्हे केला. भगीरथ प्रयत्न, बुद्धिमत्तेची कसोटी, असामान्य धाडस, अफलातून इंजिनिअरिंगची कमाल, बळकट इच्छाशक्ती, परिश्रमांची पराकाष्टा यांच्या जोरावर कोकण रेल्वेचे प्रत्यक्षात आली. कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातून ७३८ किमीचा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यातून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते, ती मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील थोकुर रेल्वे स्टेशनला संपते. चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे वरदानच ठरल्याचे सांगितले जाते. संपूर्ण देशात कोकण रेल्वेचा गौरव केला जातो. इतकेच नव्हे तर, खडतर रेल्वेमार्ग बांधण्यासाठी कोकण रेल्वेची आवर्जून मदत घेतली जाते. आताही जम्मू काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक प्रोजेक्ट अंतर्गत बांधल्या जात असलेल्या चिनाब नदीवरी जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाच्या निर्मितीमध्ये कोकण रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. सध्या मेल, एक्स्प्रेस, राजधानी, तेजस, जनशताब्दी यांसह आता वंदे भारत ट्रेन कोकणवासीयांच्या सेवेत दाखल झाली आहे.
कोकण रेल्वे आणि गतिमान रेल्वेसेवेची कसोटी
कोकण रेल्वेवर एकच ट्रॅक असून सुद्धा दिवसाला शेकडो ट्रेन सेवांचे व्यवस्थापन अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि शिस्तीने केले जाते. याबाबत कोकण रेल्वेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यात उन्हाळी सुट्या, सण-उत्सव या काळात शेकडो जादा सेवा चालवल्या जातात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. मात्र, कोकण रेल्वेचा खडतर मार्ग आणि एकपदरी ट्रॅक यांमुळे कोकण रेल्वेच्या गतिमानतेला मर्यादा आहेत. असे असले तरी मुंबई ते गोवा मार्गावर जलद, गतिमान रेल्वेचा आशेचा किरण घेऊन सुरू झाली ती जनशताब्दी एक्स्प्रेस. अन्य मेल, एक्स्प्रेस तसेच अन्य रेल्वेसेवांना मुंबई ते गोवा हे अंतर कापायला १२ ते १५ तास लागत होते. तेच अंतर या जनशताब्दी ट्रेनमुळे सुमारे ८ ते ८.३० तासांवर आले. त्यामुळे एका दिवसांत मुंबईहून गोव्याला आणि गोव्यातून परत मुंबईत येणारी रेल्वेसेवा प्रत्यक्षात आली. यानंतर डबलडेकर, तेजस आणि आता वंदे भारत या ट्रेन या मार्गावर दररोज धावत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात कायम दरड कोसळण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने या काळात या मार्गावरील वेग हा काही ठिकाणी अतिशय मर्यादित असतो.
मुंबई – गोवा वंदे भारत ट्रेनच्या लाँचिंगची ‘वेळ’ चुकली का?
मुंबई ते गोवा या मार्गावर वंदे भारत ट्रेनची प्रतीक्षा केली जात होती. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर वंदे भारतची सेवा सुरू करण्यात आल्यानंतर मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत सुरू होण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. अखेरीस २७ जून २०२३ रोजी मुंबई ते गोवा मार्गावर ही सेवा सुरू झाली. मात्र, या ट्रेनच्या लाँचिंगची वेळ चुकली का, अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे. याचे कारण म्हणजे उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर चाकरमानी आपापल्या कामावर परततात. मुलांच्या शाळा सुरू होतात. मान्सूनमधील मुसळधार पावसामुळे पर्यटन व्यवसायही मंदावलेला असतो. त्यामुळे या मार्गावरील सुरू असलेल्या रेल्वेसेवांमध्ये प्रवाशांची संख्या रोडावते. जून ते साधारण गणपतीपर्यंत मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी, तेजस यांसारख्या ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असते. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस या सेवा तर बहुतांश रिकाम्या जातात. त्यामुळे जून महिन्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे किती व्यवहार्य आहे, याबाबत शंका घेण्यास वाव आहे.
दुसरे म्हणजे जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस या दोन ट्रेन मुंबईहून पहाटे गोव्याच्या दिशेने रवाना होतात. दुपारी गोव्यात पोहोचतात आणि दुपारी मुंबईच्या दिशेने पुन्हा रवाना होऊन त्याच दिवशी रात्री मुंबईत परततात. वंदे भारत एक्स्प्रेसची वेळही अशीच ठेवण्यात आली आहे. या तीनही ट्रेनच्या मुंबईतून सुटण्याच्या वेळेत फक्त १५ ते २० मिनिटांचे अंतर आहे. जनशताब्दी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सुटते. वंदे भारत ५ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. तर तेजस एक्स्प्रेस ५ वाजून ५० मिनिटांनी सुटते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या सेवा असल्या तरी यांना मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत मनात शंका निर्माण होते. मुंबईतून एकामागून एक सेवा सोडण्यापेक्षा सकाळच्या वेळेत गोव्याहून एखादी ट्रेन सुरू होऊ शकते का, यावर विचार करायला हवा. म्हणजेच आता जशी मुंबईहून सकाळी ट्रेन जाऊन रात्री परत येते, त्याचप्रमाणे गोव्याहून सकाळी मुंबईसाठी ट्रेन येऊन त्याच दिवशी ती गोव्यात परत जाईल, अशी व्यवस्था केली जाऊ शकते का, यावर रेल्वेने विचार करावा. मुंबईवरील रेल्वे ट्रॅफिकचा भार पाहता, वसई-विरार किंवा मुंबई सेट्रल या भागातून कोकणात जाणारी अशी एक दिवसीय रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत रेल्वेने विचार करावा.
वंदे भारत आणि विमान तिकीट दरांची तुलना किती व्यवहार्य?
मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १८१५ रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३३६० रुपये आहे. दुसरीकडे, मडगाव ते मुंबई या मार्गासाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १९७० रुपये असून, एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३५३५ रुपये आहे. काहींच्या मते वंदे भारतचे तिकीट दर हे विमानाच्या तिकीट दरांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे एवढी महाग तिकिटे काढून प्रवासी वंदे भारत ट्रेनला पसंती देतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, ही शंका फोल ठरू शकते हे प्रवाशांनीच दाखवून दिले आहे. कारण २०२३ च्या गणेशोत्सवासह अनेक तारखांची वंदे भारत ट्रेनची तिकिटे फुल्ल झाली असून वेटिंग लिस्ट शेकडोच्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. दुसरे म्हणजे, वंदे भारतच्या तुल्यबळ असलेल्या तेजस एक्स्प्रेसच्या तिकिटांचे दर साधारण असेच आहेत. तेजस एक्स्प्रेसचे एसी चेअर कारचे तिकीट १६१० रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट ३१३० रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे तिकीट २९१५ रुपये आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट आणि तेजस एक्स्प्रेसचे तिकीट यामध्ये फारसा फरक नाही. प्रवाशांनी जसे तेजस एक्स्प्रेसला प्रेम दिले, तसेच स्वागत वंदे भारत एक्स्प्रेसचे होऊ शकते आणि विमान प्रवासाबाबत बोलायचे झाल्यास विमानाचे दर स्थिर नसतात. आपल्याला ज्या दिवशी प्रवास करायचा आहे, तो दिवस जसजसा जवळ येतो, तसे विमान तिकिटाचे दर वाढतात. उलट रेल्वेचे दर स्थिर असतात. दुसरे म्हणजे मुंबईहून गोव्याला विमान प्रवास करायचा असेल तर दाबोळी आणि मनोहर ही दोन विमानतळे आहेत आणि ही दोन्ही विमानतळे तशी सोईची नाहीत. विमातळावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाणे जास्त खर्चिक आहे. याउलट रेल्वेने गेल्यास हा खर्च तुलनेने कमी येतो.
तेजस एक्स्प्रेसपेक्षा वंदे भारत काकणभर सरसच
तेजस एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तसे पाहायला गेल्यास साम्यस्थळे अधिक आहेत. मात्र, तेजस एक्स्प्रेसपेक्षा वंदे भारत काकणभर सरसच आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये आरामदायीपणा, सुलभता, गतिमानता, अत्याधुनिकता, तंत्रज्ञान, डिझाइनमधील आकर्षकपणा यांचा सुंदर मिलाफ पाहायाला मिळतो. वंदे भारत ट्रेनमध्ये मार्गावरील स्थानके, ट्रेनची मार्गावरील स्थिती, पुढील स्थानकांची होणारी घोषणा, आसन व्यवस्थेचे वेगळेपण, स्थानकावरून गाडी सुटण्यापूर्वी लोको पायलटकडून केल्या जाणाऱ्या सूचना यांसारख्या अनेक गोष्टी या ट्रेनला स्पेशल बनवतात आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतात. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, यात तीळमात्रही शंका नाही.