मेहकर : रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबत दिवसेंदिवस रक्ताची कमतरताही भेडसावत आहे. अशातच शासकीय रक्तपेढय़ांनी रक्ताचे दर ६0 टक्क्यांनी वाढविले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी चालू महिन्यापासूनच सुरू झाली असून, शासकीय रक्तपेढय़ांमध्ये रूग्णांना ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. परिणामस्वरूप, खासगी रक्तपेढय़ांनीही रक्ताचे दर वाढविले आहेत. नागपूर येथील दि फेडरेशन ऑफ ब्लड बँक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दरवाढीसंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्त व रक्त घटकाच्या प्रक्रिया शुल्कात फेरबदल करण्यासाठी खासगी रक्तपेढी, रेडक्रॉस, शासकीय रक्तपेढी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या १६ सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सेवाशुल्कात वाढ करण्याची शिफारस केली होती. या शिफारशीस राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने मंजुरी दिली. त्यानुसार शासकीय रक्तपेढय़ांनी जुलै महिन्यापासून रक्ताच्या दरात ६0 टक्क्यांची वाढ केली आहे. शासकीय रक्तपेढय़ांमध्ये पूर्वी रक्तासाठी प्रतियुनिट ४५0 रुपये खर्च करावे लागत होते. आता १ हजार ५0 रुपये मोजावे लागत आहेत.
रक्ताची बाटली ६0 टक्क्यांनी महागली
By admin | Published: July 22, 2014 12:09 AM