ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 27 - एखाद्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही अन् रुग्ण दगावल्यास नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाण किंवा शिवीगाळ केली जाते. परंतु रुग्णासोबत कोणीही नसताना त्याचे पालक बनून त्याची सुश्रूषा केल्याचे ऐकल्यावर पटकण विश्वास बसणार नाही. मात्र हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा एका रुग्णास डॉक्टरांनी जीवदान दिले.
हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील अंबुबाई व नवसाजी खंदारे हे पती-पत्नी वसमत तालुक्यातील पोखर्णी येथे शेती कामाकरिता वास्तव्यास आहेत. परंतु २८ मे रोजी नांदुरा येथे अंबुबाई खंदारे यांच्या भाच्याचा विवाह सोहळा असल्याने, अंबुबाई नवसाची खंदारे हे दोघे पूर्णा येथून २६ मे रोजी रात्री १२ च्या रेल्वेने नांदुरामार्गे निघाले होते. मात्र नांदुरा रेल्वेस्थानक समजून जूनूना रेल्वेस्थानकावर अंबुबाई उतरण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्यांच्या पतीने त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचा पाय प्लॅटफॉर्मच्या खाली गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर आदळल्या. परंतु त्यांचा पाय रेल्वेच्या पायºयांमध्ये अडकल्याने मोडला. तर रेल्वे अन् त्यात त्यांचे पतीही समोर गेले. अंबुबार्इंनी जोरजोरात आरडा-ओरडा केला काही ग्रामस्थ त्यांच्यावजवळ धावून गेल. वसमत येथील १०८ या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क साधला.
काही वेळातच ती घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. रवि करवंदे यांनी रुग्णवाहिकेत उपचार करत जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पहाटे ३. ३० च्या सुमारास तिला दाखल केले. विशेष म्हणजे महिलेसोबत कोणीही नव्हते. दरम्यान, येथे डीएमओ असलेले डॉ. अग्रवाल व आपतकालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. इनायतुल्ला खान यांनी सदर महिलेवर प्राथमिक उपचार केले. सकाळी महिलेची तपासणी केली असता महिलेचा पाय पूर्ण निकामी झाल्याने तो कापल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
लागलीच उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसलाही विचार न करता थेट शस्त्रक्रियेची तयारी केली. शस्त्रक्रिया यशस्वी करुन महिलेचा उजवा पाय काढून टाकण्यात आला. महिलेच्या सांगण्यावरून खर्डा येथील काही नातेवाईकांशी डॉक्टरांनी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. दुपारी दोनच्या सुमारास महिलेचा भाचा तेथे आला.
डॉक्टरांनी स्वत: केले रक्तदान
महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे महिलेला रक्ताची नितांत गरज होती. परंतु जिल्हासामान्य रुग्णालयातील रक्त पेढीमध्ये एबी ग्रुपचे रक्तच उपलब्ध नसल्याने, या ग्रुपचे रक्त मिळविण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. एवढेच काय तर विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवहरी एबी ग्रुपचे रक्त असणाºयांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. परंतु बराच वेळ प्रतीक्षा करुनही रक्त मिळत नसल्याने आपातकालीन सेवेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईनायतुल्ला खान यांनी स्वत: रक्तदान करुन सदर महिलेला रक्त दिले. एकंदर सर्व डॉक्टरांनीच सांघिकपणे केलेल्या कार्यामुळे ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला.