ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ४ - कामाचे पैसे मागण्यास गेलेला तरुण खलील खान अमिर खान (३०) राहणार मिसारवाडी याचा निर्घृण खून केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश आर.आर. काकाणी यांनी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ३००० रुपये दंड ठोठावला.
१२ सप्टेंबर २०११ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास खलील खान हा शेख नसीर उर्फ चुन्नू शेख हसन याच्याकडे सेंट्रिंग कामाचे पैसे मागण्यासाठी गेला होता. त्याला शेख हसन, शेख नसीर उर्फ चुन्नू, शेख अश्पाक शेख हसन, अमजद खान महेमुद खान , नईमखान महेमुद खान नईम व विधी संघर्ड बालक सर्व राहणार मिसारवाडी यांनी कुऱ्हाड व चाकूने छातीवर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केला. खलीलचा भाऊ अफसर खान अमिरखान याच्या तक्रारीवरुन पाच जणाविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक मारोती डब्बेवाड यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील सुरेश शिरसाठ यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. खलीलखानच्या श्वविच्छेदन अहवालत त्याच्या अंगावरील असलेल्या खोलवर जखमा होऊन अधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले होेते. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पाच जणांकडुन कुऱ्हाड, चाकु, लाठ्या - काठ्या जप्त केल्या होत्या. त्यावर असलेले रक्त आणि कपड्यावर उडालेले रक्त हे मयत खलीलखानच्या रक्त गटाशी जळून आला असल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल हे पुरावे ग्राह्य धरुन सुनावणीअंती आज न्यायालयाने शेख हसन, शेख नसीर उर्फ चुन्नू, शेख अश्पाक शेख हसन, अमजद खान महमुद खान आणि नईम खान महमुद खान यांना दोषी ठरवून जन्मठेपेच्या आरोपाखाली भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये पाचही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ३००० रुपये दंड ठोठावला.
तसेच भा.दं,वि.१४३ खाली प्रत्येकी ६ महिने कारावास, कलम १४७ व १४८ खाली प्रत्येकी दोन वर्षे कारावास अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चासकर , हेडकॉन्सटेबल कोलते, नाईक धुरटे, कॅन्सटेबल पाटील यांनी साक्षीदारांना योग्य ते मार्गदर्शन करुन अभियोग पक्षाला मदत केली.