ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. २१ : बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून भावाने मित्राच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून झूम प्रकल्पाशेजारील शेतवडीत जांबियाने भोसकून डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचे शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आले. मृत भरत दगडू कांबळे (वय ३0, रा. माले, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित मनोज ऊर्फ मनीष दगडू कांबळे (२३), त्याचा मित्र विनायक आदिनाथ माने (२२, दोघे रा. पन्हाळकर गल्ली, विचारेमाळ) यांना अटक केली.
अधिक माहिती अशी, संशयित मनोज कांबळे याला बहिणीचे भरत कांबळे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्याने व तिच्या पतीने भरतला समज दिली होती. या वादातून बहीण माहेरी विचारेमाळ येथे राहण्यास आली. त्यानंतरही दोघांचे मोबाईलवर बोलणे होत होते. तो कोल्हापुरात येऊन भेटत होता.
पती, भाऊ यांच्या विरोधामुळे दोघांनी पुण्याला पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने पतीला फोन करून दोन मुलांपैकी मुलगा माझ्याकडे व मुलगी तुमच्याकडे ठेवा, मी भरतसोबत पुण्याला जाणार असल्याचे सांगितले. पतीने हा प्रकार तिचा भाऊ मनोजला सांगितला. त्यामुळे सुडाने पेटलेल्या मनोजने भरतला संपविण्याचा निर्णय घेतला. त्याने मित्र विनायक माने याची मदत घेतली. या दोघाकडे पोलिस कसून माहिती घेत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
भरत कांबळे (मृत) शुक्रवारी (दि. १९) रात्री दहा वाजता भरत कांबळे व संशयिताची बहीण पुण्याला पळून जाण्याच्या उद्देशाने रेल्वे स्टेशनवर आले. यावेळी तिने पतीला फोन करून मुलास आपल्याकडे सोडण्यास सांगितले.
मोबाईल हा संशयित मनोजकडे असल्याने तो मित्राला घेऊन रेल्वे स्टेशनवर आला. याठिकाणी बहीण व भरत दोघेजण बसले होते. भरतला रिक्षामध्ये बसवून ते झूम प्रकल्पाचे पाठीमागील बाजूस कदमवाडी ते कसबा बावडा जाणार्या रोडच्या पूर्वेकडील बाजूच्या शेतवडीतील पाणंदीमध्ये आले.
या ठिकाणी त्याला खाली उतरून मनोजने जवळ असलेल्या जांबियाने भोसकले. वार खोलवर झाल्याने तो खाली कोसळला. यावेळी दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घालून ठेचून ठार मारले. कोल्हापुरात झूम प्रकल्पाशेजारील शेतवडीत भरत कांबळे याचा खून केल्याचे ठिकाण पोलिसांना दाखविताना संशयित आरोपी मनोज कांबळे व विनायक माने. पोलिसांसमोरच नातेवाइकांना खुन्नस
भरत कांबळेचा खून झाल्याचे पोलिसांनी त्याच्या माले येथील नातेवाइकांना सांगितले. ते शुक्रवारी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. पोलिस अधिकारी तपासासाठी बाहेर गेल्याने झाडाखाली बसले होते. दुपारी बाराच्या सुमारास संशयितांना घटनास्थळावरून फिरवून पोलिस ठाण्यात आणले. यावेळी आतमध्ये जाताना मृत भरतच्या नातेवाइकांना पाहताच मनोज पोलिसांसमोरच त्यांच्याकडे पाहून खुन्नस देत होता.
स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर - भरत कांबळे हा मृत झाल्याचे पाहून तेथून संशयित मनोज कांबळे व विनायक माने हे दोघेजण थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. या ठिकाणी आपण खून केल्याची कबुली देत स्वत:च फिर्याद दिली. खून हा शब्द कानावर पडताच पोलिसांची झोपच उडाली. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व सहायक पोलिस निरीक्षक विलास भोसले व सहकार्यांनी आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. या ठिकाणी रक्ताच्या थोराळ्यात भरतचा मृतदेह पडला होता. पंचनामा करून मृतदेह सीपीआर शवविच्छेदनगृहाकडे पाठविला. एकमेकांचे नातेवाईक संशयित मनोज कांबळे व मृत भरत कांबळे हे नातेवाईक आहेत. भरतचे लग्न झाले असून, एक मुलगा आहे. पत्नी सध्या गरोदर आहे. तो काही कामधंदा करीत नसे. संशयित डिजे ऑपरेटरचे काम करतो.