पिंपरी : महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली,तसे वातावरण बदलू लागले आहे. गुन्हेगारी कारवाया वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शहरात प्रत्यक्षात खून सत्र सुरू झाले आहे. ऐन दिवाळीत एकाच आठवड्यात घडलेल्या खुनाच्या दोन घटनांनी शहर हादरुन गेले आहे. फेब्रुवारी २०१७ ला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी त्यात आणखी वाढ होणार याचे संकेत या घटनांमुळे मिळू लागले आहेत. पोलिसांपुढे कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान आहे. ऐन दिवाळीत एका आठवड्यात खुनाच्या दोन घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडल्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी भोसरीत विकास माळी या तरूणाचा खून झाला. स्थानिक गुंडांच्या वर्चस्ववादातुन हा प्रकार घडला असल्याचे कारण पुढे आले आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य पाच आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी विकासचा खून करण्यात आला. विकासच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय काटे याचा खून ज्या टोळीने केला होता, त्या टोळीत विकास माळी याचाही सहभाग होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने विकासला धारदार शस्त्राचे वार करून संपविण्यात आले. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी विकासचा खून झाला. हे पुढे कारण पुढे आले असले तरी दोन टोळ्यांमधील वर्चस्ववाद नेमका काय आहे? असा मुद्दाही उपस्थित झाला. ‘मसल पॉवर’साठी राजकीय मंडळी अशा स्थानिक गुंडांच्या टोळयांची मदत घेत असते. हे सर्वश्रुत आहे. अवघ्या चार महिन्यांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणूक एनकॅश करण्याचा जो तो प्रयत्न करत आहे. निवडणुकीत आर्थिक लाभ कसा उठवायचा याचाच अनेकजण त्यांच्या पातळीवर विचार करत आहेत. तयारीसुद्धा सुरू आहे. त्यासगुन्हेगारही अपवाद नाहीत. राजकीय मंडळींना मदत करण्याच्या उद्देशाचे त्यांचेही प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. त्यातून स्थानिक गुंडांमध्ये वर्चस्व वाद उफाळून येऊ लागला आहे.(प्रतिनिधी)> भोसरीतील खुनाच्या घटनेला चार दिवसांचा अवधी उलटला नाही, तोच पिंपरीत अमर इंगवले या तरुणाचा खून झाला. चोरी, घरफोड्या अशा गुन्हेगारी घटना कमी होऊन खून, हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दहशत माजविण्याचे हे प्रकार असून महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे घडू लागले आहेत. वर्ष, दोन वर्षासाठी तडीपार केलेले गुंड आदेशाचा भंग करून शहरात वावरताना आढळून येऊ लागले आहेत. काही राजकारण्यांची त्यांना फूस असून साम, दाम, दंड, भेद या तंत्रांचा अवलंब करण्याचा उद्देश असलेल्या राजकारण्यांकडून अशा प्रकारांना बळ दिले जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर खूनसत्र सुरू
By admin | Published: November 04, 2016 1:32 AM