विशेष प्रतिनिधीमुंबई - राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. न्यू यॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून गुरुवारी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले. भारताचे न्यू यॉर्कमधील कॉन्सुल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरीत्या काम करण्याचा मनोदय ब्लूमबर्ग यांनी या वेळी व्यक्त केला.महाराष्ट्र मित्रमंडळात भाषणमहाराष्ट्राने देशातील अग्रेसरत्व पुन्हा सिद्ध केले असून देशाच्या विकासयात्रेचा अग्रदूत म्हणून आपले राज्य सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विविध क्षेत्रांतील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे मुंबई आपली ओळख कायम राखून अत्यंत गतीने परिवर्तन अनुभवत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यूयॉर्क येथे काढले. न्यू यॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि महाराष्ट्र मित्र मंडळातर्फे मुंबई मीट्स मॅनहटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थितांशी मराठीत दिलखुलास संवाद साधला. मुंबईसह राज्यात उभारत असलेले पायाभूत सेवा प्रकल्प, जलयुक्त शिवार आदीबाबतची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग सहकार्य वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:24 AM