डिंभे : डिंभे धरणातील पाण्याने यंदा तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाची भिंत त पाणलोट क्षेत्रातील पाटण- बोरघर ही खोरी उघडी पडली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीच शिल्लक राहिले नसल्याने जुने आंबेगाव गावठाण, घोड व बुब्रा या नद्यांचा संगम उघडा पडला आहे. वचपे येथील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले सिद्धेश्वराचे स्थानही उघडे पडले असून, अनेक वर्षांनंतर धरणातील पाणी तळाशी गेल्याने डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळाला आहे.पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांबरोबरच शिरूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणून या भागात हरित क्रांती घडविणाऱ्या डिंभे जलाशयातील पाण्याने आता तळ गाठला आहे. धरणाचे बॅक वॉटर आसणाऱ्या घोड व बुब्रा या नद्यांची पात्रे दूरपर्यंत कोरडी ठणठणीत पडली आहेत. यंदा पाण्याअभावी डिंभे धरणाच्या आतील पाणलोट क्षेत्रातील बेंढारवाडी, पाटण-कुशिरे आणि अडिवरे-बोरघर ही तिन्ही खोरी आटली असून त्या भागातील आदिवासी गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गावातील मंदिरे, भरणाऱ्या यात्रा-अखाड्यांच्या जागा व पिढ्यान् पिढ्या पोटच्या मुलापेक्षाही जिवापाड जपलेली वडिलोपार्जित शेतीवाडी, आंबा जांभूळ, चिंचेच्या झाडांखाली सवंगड्यांसोबत घालविलेल्या बऱ्या-वाईट आठवणी या उघड्या पडलेल्या जागा पाहून प्रत्येकाच्या मनात काहूर पेटवत आहेत. (वार्ताहर)शिलालेख, नक्षीकाम व मूर्ती जशाच्या तशाधरणातील पाण्याने तळाचा ठाव घेतला असून वचपे, फुलवडे व आंबेगाव ही पाण्याखाली गेलेली गावे उघडी पडली आहेत. आंबेगाव येथे असणारे पुरातन जैन मंदिर सध्या पूर्णत: उघडे पडले असून, तब्बल २० ते २५ वर्षांच्या कालावधीत पाण्याखाली राहूनही या मंदिराच्या भिंती शिलालेख, नक्षीकाम व मंदिरावरील मूर्ती जशाच्या तशा आहेत. गावातील हिंदू देवालयांतील गणपतीच्या मूर्ती, मंदिरासमोर असणारे नंदी तसेच पूजेचे पाळे यांचेही सध्या दर्शन होत असून, या साऱ्या वस्तू पूर्वीच्या आंबेगाव गावठाणाची साक्ष देतात. >घाणे गाळण्यासाठी तयार केलेल्या दगडी उखळी अजूनही शाबूतपूर्वी आंबेगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ होती. दर बुधवारी येथे बाजार भरत असे. तर, होळीला येथील बाजार तीन दिवस चाले. आंबेगाव, खेड व जुन्नर या तालुक्यांतील व्यापारी या बाजारासाठी येत. येथे तेलाचे घाणे मोठ्या प्रमाणात चालायाचे. हे घाणे गाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दगडी उखळी अजूनही येथे मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. यावरून येथे मोठ्या प्रमाणात तेल गाळले जायचे, याचा अंदाज येतो.गावकरी देताहेत जुन्या आठवणींना उजाळा सध्या धरणातील पाणी आटले, भिंत उघडी पडली असून, वचपे येथील सिद्धेश्वर मंदिराची जागा व घोड आणि बुब्रा या नद्यांचा संगम पाहावयास मिळत आहे. पावसाळा सुरू होताच ज्या नदीला पहिल्यांदा पूर येई, ती नदी दुसऱ्या नदीला भेटल्याशिवाय पुढे जात नसे, अशी येथील आख्यायिका आहे. धरणातील पाणीसाठा आटल्याने पुनर्वसित झालेले गावकरी सध्या या भागात फेरफटका मारून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच ठिकाणी आपले जुने घर होते. पाणी खाली-खाली गेले, की मायभूमीपासून दूरवर पुनर्वसित झालेल्या गावकऱ्यांची पावले नकळत इकडे वळत असल्याचे पाहावयास मिळते. यंदा पाणीपातळी कमालीची घटल्याने डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र रिकामे झाले. धरणाची भिंत ते पाटण - आहुपे खोऱ्यापर्यंतच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळत आहे.आंबेगाव येथे तेलाचे घाणे गाळले जायचे. घाण्यासाठी वापरण्यात येणारे हे दगडी घाणे. यावरून या बाजारपेठेचा अंदाज येतो.चुनखडी व चौकोनी विटांत बांधण्यात आलेल्या येथील वाड्यांच्या भिंती आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.
तळ गाठल्याने ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
By admin | Published: June 10, 2016 1:11 AM