कामठी (नागपूर) : समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी चुकीच्या माणसांना झोडपून काढावे. त्याचबरोबर समाजातील चांगल्या व्यक्तींची सदैव पाठराखण करावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.कामठी, कामठी जुनी व हिंगणा पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर, समाजात कायद्याची दहशत निर्माण होऊ शकते. आम्ही सार्वजनिक जीवनात असतो; आमच्या सोबत कुणीही फोटो काढतो. पण पोलिसांनी गुन्हेगार ओळखावे आणि सामान्य माणसाला संरक्षण द्यावे. दुसरीकडे, चुकीच्या लोकांना कायद्याचा आधार घेत ठोकून काढावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.गृह विभागाचे काम अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. नागपूरप्रमाणे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्यास सरकार यशस्वी होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असल्याने त्यांनी नागपूर शहर पोलिसांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)राजकीय हस्तक्षेप नाही : मुख्यमंत्रीपोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पूर्वी राजकीय हस्तक्षेप केला जायचा. त्यामुळे अधिकाऱ्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ मिळायचे. यातून भ्रष्टाचार वाढीला लागला होता. आता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार केल्या जातील. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
चुकीच्या माणसांना झोडपून काढा!
By admin | Published: May 16, 2016 2:26 AM