- गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊस, विविध कंपन्यांना पालिकेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - लसीकरणाचा निर्णायक टप्पा शनिवारपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील प्रत्येक विभागात एक याप्रमाणे एकूण २२७ लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व २४ सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत. विभागातील आरोग्य केंद्र हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरु करावीत. पालिकेच्या दवाखान्यांसह जवळच्या खासगी रुग्णालयांना देखील त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरुन, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोयीचे होईल, अशी सूचना त्यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत केली.
अंधेरीत लस साठवण केंद्र...
सध्या परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील साठवण केंद्रातून शहर भागाला लसींचा पुरवठा केला जातो. आता पालिकेच्या वतीने अंधेरीमध्ये प्रादेशिक लस भांडार सुरु करण्यात येणार आहे. हे लस साठवण केंद्र सुरु झाल्यावर सध्याच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस भांडारातून पूर्व उपनगरांसाठी तर अंधेरीतील केंद्रातून पश्चिम उपनगरांसाठी लस वितरण करण्यात येणार आहे.