लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला असताना 'डेल्टा ' विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कोविड रुग्णांसाठी खाटा वाढविणे, औषध - इंजेक्शनचा साठा ठेवणे, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा असल्याचे खातरजमा करण्याची ताकीद त्यांनी संबंधितांना दिली आहे.
मागील काही दिवसांमध्ये कोविड बाधित रुग्णांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. यामध्ये कोविड विषाणूच्या डेल्टा प्रकारचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी सोमवारी ऑनलाइन आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी व विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. त्यानुसार कोविड प्रतिबंधक नियमांच्या कठोर अंमलबजावणीचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सील इमारतींबाहेर पोलीस पहारा
पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेली इमारत सील करण्यात येते. अशा इमारतींमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. यामध्ये इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांचा देखील समावेश असेल. तसेच सील इमारतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
विनामास्क फिरणाऱ्यावरील कारवाई तीव्र
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिकेबरोबरच पोलिसांमार्फत होणारी कारवाईही तीव्र करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधितांना केली आहे.
ऑक्सिजन केंद्रांची चाचणी
दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयांमध्ये सुरू केलेल्या ऑक्सिजन केंद्रांच्या क्षमतेची चाचणी घेऊन प्रत्येक खाटेपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण
कोरोनाच्या प्रसारास झोपडपट्टी व चाळीतील सार्वजनिक शौचालय कारणीभूत ठरतात. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक शौचालयांचे दररोज पाच वेळा निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
मलेरिया, डेंग्यूपासून सावध
कोविड व्यतिरिक्त मलेरिया, डेंग्यू या आजारांबाबतही सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश कीटकनाशक विभागाला देण्यात आले आहेत.